अमेरिकेतील राजकीय परंपरेनुसार आणि प्रक्रियेनुसार राष्ट्राध्यक्ष पदासाठीची शर्यत दोन वर्षे आधीपासूनच सुरू होते. ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केल्यामुळे ट्रम्प विरुद्ध बायडेन अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्राध्यक्षपदासाठी अन्यही अनेक जण इच्छुक आहेत.
दीड वर्षांनी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीसाठी डेमोक्रॅटस् आणि रिपब्लिकन तयारीला लागले आहेत. या निवडणुकांमध्ये बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच स्पर्धा रंगणार का, असा मुद्दा सध्या जगभरात चर्चिला जात आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हेच दोन चेहरे एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. अलीकडील काळात बायडेन यांची लोकप्रियता कमी कमी होत चालली आहे. तरीसुद्धा सध्या त्यांना ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक समर्थन मिळत असल्याचे दिसून येते. “एमर्सन’ने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार डेमोक्रेट्स चार टक्क्यांनी आघाडीवर आहेत. खरे तर बायडेन विरुद्ध ट्रम्प हा सामना पुन्हा एकदा होण्यास मतदारांची जराही पसंती नाहीये. नुकत्याच अमेरिकेत पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांचा विचार करता जवळपास 60 टक्के अमेरिकन नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा व्हाइट हाउसमध्ये परतावे असे वाटत नाही. दुसरीकडे, बायडेन विरुद्ध ट्रम्प या लढतीचा अर्थ असाही होतो की, अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता धुसर झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे 15 नोव्हेंबर रोजी आपली उमेदवारी घोषित केली. अनेक कोर्टकचेऱ्यांची प्रकरणे आणि चौकशींना सामोरे जाणाऱ्या ट्रम्प यांना कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये परतायचे आहे. त्यासाठीच पुन्हा राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला. आपल्या फ्लोरिडा येथील मुख्यालयात ट्रम्प यांनी म्हटले, “अमेरिकेला पुन्हा एकदा महान व गौरवशाली बनवण्यासाठी मी आज रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी घोषित करीत आहे.’ मात्र, एक नवीन चेहरा शोधणाऱ्या “ग्रॅंड ओल्ड पाटी’ अर्थात जीओपी नेत्यांच्या आकांक्षेला धक्का बसला आहे. आपल्याला मिळणाऱ्या सततच्या समर्थनाच्या आधारे आणि आपल्या श्वेत वर्णवर्चस्वाच्या विचारसरणीमुळे ट्रम्प यांना विजयाचा विश्वास वाटतो. परंतु ट्रम्प व्हाइट हाउसमध्ये जाण्यासाठी एखादा सोपा मार्ग शोधत आहेत. नवनवीन जनमत सर्वेक्षणांतून असा संकेत मिळतो की, रिपब्लिकन पार्टीच्या नामांकनांमध्ये इतर उमेदवारांपेक्षा ट्रम्प सर्वात पुढे असतील. मध्यावधी निवडणुकीने असेही दर्शविले आहे की, रिपब्लिकनला मतदारांचे 55 टक्के समर्थन आहे. याउलट रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या डे सॅंटिस यांना मात्र 25 टक्के मतदारांचे समर्थन आहे. डे सॅंटिस यांनी अलीकडेच गव्हर्नरपदावरील आपला दुसरा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून एक ठोस राजकीय आधार बनविला आहे. त्यामुळे तेसुद्धा राष्ट्राध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गूपचूपपणे आपला 80वा वाढदिवस साजरा केला. याच महिन्यात झालेल्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालांमुळे बायडेन उत्साही दिसत आहेत. आपल्या वाढत्या वयाचा अडसर येऊ न देता बायडेन यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “मी औपचारिक निर्णय घेतलेला नाही. मात्र माझी इच्छा आहे की मी पुन्हा धावावे आणि आमच्याकडे याबाबत निर्णय घ्यायला अद्याप पुरेसा वेळही आहे.’ दोन्ही पक्षांमधून 2023 पर्यंत आणखीही उमेदवार पुढे येऊ शकतात; तर काही उमेदवार माघारी जातील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणखी रंजक होणार आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना बायडेन यांची खुर्ची घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे कदाचित बायडेन कमला यांचे नाव पुढे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अर्थात, अद्यापपर्यंत कमला हॅरिस यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत.
बायडेन यांचे परिवहन सचिव पीट बटिगिएग हेदेखील सध्या संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. आगामी काळात त्यांच्या प्रचारमोहिमेला यश आले आणि ते विजयी झाले तर अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासातील ते पहिले समलैंगिक राष्ट्राध्यक्ष ठरू शकतात. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांच्याकडेही निवडणुका लढवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांना डेमोक्रेटिकचे समर्थनही आहे. अलीकडेच त्यांनी गर्व्हनर म्हणून दुसऱ्या कार्यकाळात प्रवेश केला. याखेरीज 2016 मध्ये हिलरी क्लिंटन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेले आणि पुन्हा 2020 मध्ये बायडेन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणारे बनी सेंड्रस यांनी मात्र 2024 बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ट्रम्प यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्षपदी असलेले माइक पेंस हेसुद्धा 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कॅपिटोल दंगलीनंतर माइक यांनी आपली निष्ठा बदलली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी त्यांच्याबाबत स्पष्ट मत दिले आहे की, तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा तिकीट देताना पेंस यांचा विचार केला जाणार नाही.
एक अन्य संभाव्य चेहरा निकी हॅली हा आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या शासनकाळादरम्यान संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत म्हणून कार्य केले आहे. खरे तर 6 जानेवारीच्या कॅपिटोल दंगलीनंतर निकी यांनी ट्रम्प यांना आपला मित्र म्हटले होते. मात्र समर्थन देताना त्यांनी याविरुद्ध भूमिका घेतली. 2023च्या सुरुवातीला त्या आपल्या इच्छाआकांक्षाबाबत खुलासा करतील, अशी शक्यता आहे.
यंदा तिसऱ्यांदा जिंकणारे रिपब्लिकन पक्षाचे टेक्सासचे गव्हर्नर 60 वर्षीय ग्रेग एबट हेही एक संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांनी रूढीवादी विचारसरणी पुढे केली आहे. त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान कोविड लसीकरण आणि मास्कचा वापर अनिवार्य करण्याला विरोध केला होता. माजी उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांची मुलगी लिज चेनी यासुद्धा संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. अमेरिकेतील राजकीय परंपरेनुसार आणि प्रक्रियेनुसार राष्ट्राध्यक्ष पदासाठीची शर्यत दोन वर्षे अगोदरच सुरू होते. मात्र शेवटचे चित्र पक्षाच्या अधिवेशनानंतरच समोर येईल. निवडणूक खर्च वाढत जात असल्यामुळे उमेदवार आस्ते कदम पावले टाकत आहेत.
यंदाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून गन कंट्रोल, अर्थव्यवस्था, गर्भपाताचा अधिकार तसेच पर्यावरणीय बदल यांसारखे महत्त्वाचे मुद्दे अजेंड्यावर आणले जातील. तर ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ “ट्रम्पिज्म’ पुन्हा परत आणणे असा आहे. बायडेन आणि ट्रम्प निवडणूक लढवणार नसतील तर 2024 मध्ये व्हाइट हाउसमध्ये नवा चेहरा पुढे येऊ शकतो.