पुणे जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीव बरसला

दौंड तालुक्‍यात तीन बकऱ्यांचा मृत्यू : आंबेगाव, शिरूर, दौंड तालुक्‍यांत झाडे उन्मळली

पुणे – गेल्या दीड महिन्यांपासून तापमानाचा पारा चढला असताना वळिवाची हजेरी होत नव्हती. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी बारामती, इंदापूर वगळता जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक फरकाने वळीव पावसाने हजेरी लावली. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व दौंड तालुक्‍यात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस पडला. पुरंदर, हवेली तालुक्‍यात काही सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दौंड तालुक्‍यातील देऊळगावगाडा येथे मारुती कोकरे यांचा गोठा पडल्याने तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाल्या आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळली तर काहींच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत.

शिरूर तालुक्‍यात मेघगर्जनेसह वाऱ्याचा वेग प्रचंड होता. यात काही ठिकाणी झाडे उन्मळली. तर काही ठिकाणी फ्लेक्‍सचे बोर्ड भुईसपाट झाले. तालुक्‍याच्या पूर्व भागात वळिवाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतात तळी साचली होती. शिक्रापूर, सणसवाडी, मांडवगण फराटा, न्हावरे, शिरूर शहरासह तालुक्‍यात वळीव बरसला. त्यामुळे उकाड्याने रापलेल्या चेहऱ्यांवर टवटवीत आला होता. हवेली तालुक्‍यात पावसाचा शिडकावा झाला. आंबेगाव तालुक्‍यात मंचर, पेठ, अवसरी बुद्रुकसह पूर्व भागात पाऊस पडला. तसेच झाडे उन्मळून पडली. जुन्नर तालुक्‍यात नारायणगाव परिसरात पावसाने काहीशी हजेरी लावली. खेड तालुक्‍यात चाकण, चिंबळी भागात वारा, वीजांसह पावसाच्या सरी कोसळल्या. दौंड तालुक्‍यात पाटस, यवत, वरवंड आदी गावांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. इंदापूर तालुक्‍यात पावसाचे वातावरण झाले होते; मात्र हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. बावडा, नीरा नरसिंहपूर परिसर, इंदापूर शहर, निमगाव केतकी, निरवांगी, वालचंदनगर परिसरातही पावसाने हुलकावणी दिली. तालुक्‍यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सायंकाळच्या सुमारास पावसाची शक्‍यता निर्माण झाली होती. यावेळी शेतकरी, नागरिकांची धांदल उडाली. मात्र, वाऱ्याच्या वेगात काळेकुट्ट ढग पुढे सरकून गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.