अस्तित्त्वाचा प्रश्‍न: भावकीला बरोबर घेत राष्ट्रवादी संघर्षाच्या तयारीत

 विधानसभेला शरद पवारांच्या “चाली’कडे लक्ष

राजेंद्र वारघडे /पाबळ: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या “भावकी’ला एकत्र यावेच लागणार. हे वास्तव असले तरी दोन्ही पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणे हाच काळाचा संकेत दोन्ही कॉंग्रेसला जाणवत आहे. हाच संकेत “भावकी’ला समजल्याने भविष्यात सत्ता मिळवण्यापेक्षा, दोन्ही पक्षांसह सर्वांचे “अस्तित्व’ टिकवणे गरजेचे राहणार असल्याची झलक पाचव्या रांगेतील आमंत्रणाने निश्‍चित झाली आहे. भविष्यात ईडीच्या वेड्यावाकड्या “चाली’तून एकेक शिलेदार “खर्ची’ घालण्याऐवजी “भावकी’च्या माध्यमातून आपले उपद्रव मूल्य दाखवणे महत्वाचे आहे आणि हाच, हवा का “रुख’ कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओळखला असावा, त्यासाठीच महाराष्ट्राचा हा “कृष्ण’ सक्रिय होत आहे. शरद पवारांची पावले याच दिशेने पडणार असल्याचे निश्‍चित दिसत आहे.

मूळ कॉंग्रेसचीच “भावकी’ असलेल्या पवार यांच्या राष्ट्रवादीने नेहमी बेरजेचे राजकारण करत राजकारणात आपले अस्तित्व टिकवले आहे, ही बाब सर्वश्रुत आहे. ते करताना कॉंग्रेस पक्षाशी असलेली आपली नाळ न तोडता इतर पक्षांनाही गोंजारले आहे. त्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपशीही बेरजेचे राजकारण करताना, मोदींनाही संलग्न ठेवत, शिलेदारांना “सेफ’ ठेवण्याची जबाबदारी सहज पार पाडताना आपले उपद्रवमूल्यही अबाधित ठेवले आहे. हे विरोधकांना सांगताना “जागा हरलो असलो तरी मी हरलो नाही’, हा “सूचक’ इशारा योग्य तेथे पोहोचवण्यात त्यांनी “भावकी’लाही सावध केले आहे.

दरम्यान या निवडणुकीत शरद पवार यांचा अंदाज चुकला की लबाडी झाली, हा भाग “अलाहिदा’ असला तरी बेरजेऐवजी वजाबाकी होऊन मोदीही दूर गेले आहेत. त्यामुळेच ईडीच्या येड्या चालीअगोदर सत्ताधाऱ्यांना रोखावे लागणार असल्याने पुन्हा एकदा आपले उपद्रव मूल्य पवारांना दाखवावे लागणार आहे. याचीच जाणीव ठेवून पवार यांची यापुढची रणनीती असणार आहे. यासाठी दिल्लीत आणि सत्ता मिळाली तर ठीकच, अन्यथा महाराष्ट्रातही प्रबळ विरोधक म्हणून आपले कसब व उपद्रव मूल्य दाखवताना मी कसा हरलो नाही, याचे उत्तर शरद पवार देणार हेही निश्‍चित असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कधी कधी भर दुष्काळात बोअरवेलला पाणी लागते. त्यामुळे समाजात विनाकारण पत वाढते. किमान आपला दुष्काळ तरी सुसह्य जातो, अगदी त्याच पद्धतीने राष्ट्रीय कॉंग्रेस त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. तर याच संधीमुळे सोनियांचा विरोधाचा मुद्दा निकालात निघाला आहे. त्या “माय-लेकांचा’ आधारही तोच आहे. अशा परिस्थितीत याच जमेच्या बाजूचा उपयोग करून, आपली बुद्धिमत्ता पणाला लावून स्वतः “कृष्ण’ बनून राहुल गांधींना केंद्रातील “अर्जुन’ करून शरद पवार युद्ध छेडणार आहेत. तर महाराष्ट्रात राज ठाकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह मोठी तरुण आमदारांची फौज निवडून आणत, मिळाली तर सत्ता अन्यथा प्रबळ विरोधकांची टीम सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठीच येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही दुष्काळातले पाणी म्हणून उपयोगात येणार आहे. ती उपयोगात आणताना राजकारणातले ठेवणीतले डावपेच काढण्याची शक्‍यता आहे. तर विरोधकांना जेरीस आणण्यासाठी जाळे विणताना ईडीच्या वेड्या वाकड्या वळणाचा फास निष्प्रभ करून, मी खरेच हरलो नाही हेच सिद्ध करण्यासाठी निश्‍चित विचाराने निर्णय घेत पावले टाकली जात आहेत; मात्र पळत दिसणारे पवार साहेब, खरेच कशासाठी धावपळ करत होते हे समजायला सत्ताधाऱ्यांना वेळ लागणार आहे आणि हीच काळ्या दगडावरची पांढरी रेघ असणार आहे हे नक्की.


थिंक टॅंकची पुढची तयारी…

राजकारणात प्रबळ विरोधकाची भूमिका बजावताना नव्या दमाची फौज तैनात करायची. त्यांना प्रमुख जबाबदारी द्यायची, नेमके मार्गदर्शन द्यायचं, म्हणजे सत्ताधारी जागेवर येतात. हाच दृष्टिकोन धरून नुकतेच राष्ट्रवादीने तीन नव्या दमाचे फलंदाज उतरवले आहेत. त्यात राजकीय, सामाजिक समन्वय साधला असून, थिंक टॅंक पुढची तयारी करत असेल, हेही नक्कीचं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.