“आर्द्रा’ची साथ, तरच खरिपाची आस!

भाजीपाल्यांचे दर कडाडण्याची भीती हवालदिल शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत

आळंदी  – रोहिणी पाठोपाठ मृगाने दगा दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता “आर्द्रा’ नक्षत्राच्या पर्जन्यवृष्टीची आस लागली आहे. शनिवारी (दि. 22) पासून या आर्द्रा’चा नक्षत्र प्रवेश होत असून त्याचे वाहन हत्ती असल्याने भारदस्तपणे चांगलाच पर्जन्य वर्षाव करावा, त्यातून काळ्या आईची कुस खऱ्या अर्थाने उजविण्यासाठी खरिपाच्या पेरणीला प्रारंभ व्हावा, अशी आस आळंदी परिसरातील बळीराजा बाळगून आहे. आताचा आर्द्रा’ पडला तरच हंगाम तगणार असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.

आळंदी परिसरात मान्सूनपूर्व सरींनीही आता पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून संपत आला तरी मान्सून पावसाचे आगमन न झाल्याने आळंदी पंचक्रोशीतील सुमारे 600 हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाचा नजरा आभाळाकडे लागल्या असून, वरूण राजा कधी बरसशील रे’ अशी आर्त साद बळीराजा घालत आहे. रोहिणी पाठोपाठ महत्त्वपूर्ण मृग’ही अगदी कोरडाठाक चालल्याने खरीप हंगामासाठी आसुसलेला शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. हा भाग सधन समजला जात असला तरी अजूनही येथील काही शेतकरी आपली गुजराण फक्‍त शेतीवरच करत असल्याने पाऊस लांबल्याने त्यांचे उत्पन्न घटते आहे. कुणी हातातील दाम खर्च करत, तर कुणी घरातले किडूक-मिडूक मोडून… कुठे गहाण ठेवून, कुठे उधार उसनवार करून मोठ्या आशेन बियाणे व खतांची तजवीज करून ठेवली होती.

कुणी बियाणे बुकिंग केके खरे मात्र, यंदा मेंढा’वर स्वार होऊन प्रवेशकर्ता झालेल्या मृगाचे स्थान आभाळातून पावसाचा एक थेंबही न पडल्याने साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. आज पडेल.. उद्या पडेल, या आशेवर आकाशाकडे आशाळभूतपणे नजर लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मृगाने निराशाच टाकली असून आता आर्द्रा’च्या हत्ती वाहनाने दगाफटका करू नये, अशी अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांच्या नजरा पुनश्‍च एकवार आभाळाकडे लागल्या आहेत.

आळंदी परिसरात भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, वाल आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. भात खाचरांमध्ये पाऊस नसल्याने तेथे भाताची लावणी खोळंबली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत रोपेही तयार केलेली नाहीत. काहींनी विहीर किंवा कुपनलिकेच्या सहाय्याने भाताची रोपे तयार केली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने त्यांची लावणी अडकून पडली आहे. आळंदीसह डुडुळगावर चऱ्होली, चिखली, आळंदी, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, मरकळ, धानोरे या आदी गावांत भाजीपाल्याच्या लागवडी खोळंबल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here