मुलगा, मित्राच्या मदतीने पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा डाव

शवविच्छेदनानंतर उलगडा; माय-लेकासह तिघे अटकेत

तळेगाव दाभाडे – अनैतिक संबंधात अडसर आणि कुष्ठरोगाच्या उपचारासाठी सततची आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने महिलेने मित्र आणि मुलाच्या मदतीने सुरक्षारक्षक पतीचा दगड आणि “जॉक’ डोक्‍यात घालून संपविले. खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता, परंतु ही बाबही शवविच्छेदन अहवाल मिळाताच उघडकीस आली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मामुर्डी गावच्या हद्दीत 22 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली. या प्रकरणी माय-लेकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

वडिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मुलाने फिर्याद दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या क्राइम युनिट 5 च्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला असता, अपघात नसून हा खून असल्याचा गुन्हा उघडकीस आणला. खुनातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी (दि. 8) न्यायलयात हजर करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नात्याला काळिमा लावण्याची घटना घडल्याने संताप व्यक्‍त होत आहे.

दामोदर तुकाराम फाळके (वय 47, रा. गजानन सोसायटी, साईनगर, गहुंजे ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दामिनी दामोदर फाळके (वय 42), राजू सुरेश कुरूप (वय 45) व वेदांत दामोदर फाळके (वय 19, सर्व रा. गजानन सोसायटी, साईनगर, गहुंजे, ता. मावळ) असे खुनातील अटक आरोपींची नावे आहेत.

दामोदर फाळके हे हिंजवडी येथे कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करीत होते. त्यांना कुष्ठरोग असल्याने उपचारासाठी आर्थिक खर्च जास्त येत होता. दामिनी फाळके हिचे राजू कुरूप यांच्यासोबत अनैतिक संबध असल्याने पती दामोदर फाळके याचा अडसर येत होता. शुक्रवारी (दि. 22) रात्री मयत दामोदर फाळके त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले असता आरोपी मोटारीतून पाठलाग करत त्यांना निर्जनस्थळी मोटारीने दुचाकीला धडक देवून खाली पडून लोखंडी जॉक व दगडाने वार करून गंभीर जखमी करून खून केला. पहाटेच्या दरम्यान अपघातात मयत झाल्याची फिर्याद खुनातील आरोपी मुलगा वेदांत फाळके यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. क्राइम युनिट 5 पथकाने या गुन्ह्याचा तपास केला असता पोलिसी खाक्‍या दाखविलाच पोपटासारखे आरोपींनी गुन्हा कबुल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.