पुणे( जिल्हा प्रतिनिधी ) – जिल्ह्यात खेड व मावळ तालुका वगळता इतर तालुक्यांत सरपंच निवडणूक ही ठरल्याप्रमाणेच होणार आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये निवडणूक 16 तारखेपर्यंत रोखली असून, याबबात जिल्हाधिकाऱ्यांसमोर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर येथील सरपंच निवडणुकीच्या तारखा नव्याने घोषित होतील.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. 18 जानेवारीला मतमोजणीनंतर नवीन कार्यकारिणी अस्तित्त्वात आली. यानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आणि सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला; मात्र काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर ही सरपंच निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे इच्छुकांना आणखी वाट पाहावी लागणार की काय, अशी परिस्थती निर्माण झाली.
ज्या कार्यकारिणीमधून नवीन सरपंच निवडायचा आहे, त्या कार्यकारिणीतील सदस्य इच्छुकांना आणखी काही दिवस सांभावे लागणार असल्याचे दिसू लागले; मात्र उच्च न्यालयात दाखल झालेल्या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडे हा निर्णय सोपवला गेला. त्यानुसार जिल्ह्यातील खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या 9 व 10 तारखेला होणाऱ्या निवडणुका 16 फेब्रुवारीपर्यंत रोखून ठेवण्यात आल्या असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. असे असताना इतर 11 तालुक्यांत मात्र निवडणुका यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे होणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
…म्हणून रोखली सरपंचपदाची निवड
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका 9 व 10 तारखेला होणार होत्या; परंतु खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी व मावळ तालुक्यातील परंदवडी या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 9 तारखेला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी साठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 9 व 10 फेब्रुवारीला होणाऱ्या खेड व मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक 16 फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवल्या आहेत.