इंद्रायणी थडीचे माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी – महाराष्ट्रात युतीचे सरकार 2014 ला स्थापन झाले तेंव्हा साडेतीन लाख कुटूंब बचतगटात होती. आता 40 लाख कुटूंब बचतगटांच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यातील अनेक बचतगटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभ मिळाला आहे. त्यातून हजारो महिला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षम झाल्या आहेत. महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल, आणि विकासाचा दर दुप्पट गाठता येईल. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथे केले.
भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजंली मंचच्या वतीने संयोजिका पूजा लांडगे यांनी भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचे उद्घाटन गुरुवारी (दि. 30) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर माई ढोरे, खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, संजय भेगडे, संयोजिका पूजा लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांचा आ. लांडगे व पूजा लांडगे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा कालीदास लांडगे (कबड्डी), सह्याद्री महेश भुजबळ (गिर्यारोहक), आकाश गजानन बांदल (कलाकार), सुरेश धोंडू चिंचवडे (सामाजिक) यांना यावर्षीचा इंद्रायणी थडी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, लोक प्रतिनिधी जागरुक असेल तरच तो समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास होऊ शकतो. राजकारण हे साधन आहे, त्यातूनच समाजाच्या शेवटच्या घटकांचा विकास लोक प्रतिनिधी करु शकतो. असा लोक प्रतिनिधी जनतेच्या मनात घर करतो. महेश हा जनतेच्या मनातील माणूस आहे. पूजा व महेश लांडगे यांनी महिलांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आयोजित केलेला इंद्रायणी थडीचा उपक्रम इतरांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.
महेश लांडगे म्हणाले की, स्त्री शिक्षणाचा, महिला सक्षमीकरणाचा पाया थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उभारला. त्यांच्यामुळेच भारतीय स्त्रीयांना शिक्षणाचे सुवर्ण प्रवेशव्दार खुले झाले. त्यातून प्रेरणा घेऊन इंद्रायणीथडीचे प्रवेशद्वार सुवर्ण बनविण्यात आले आहे. स्वागत आमदार महेश लांडगे, प्रास्ताविक नगरसेविका स्विनल म्हेत्रे, सारिका बोऱ्हाडे, आभार कामगार नेते सचिन लांडगे यांनी मानले.