बंगालमध्ये व्यावसायिक, उद्योजक तृणमूलच्या पाठीशी

कोलकता : देशाच्या पूर्व भागातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या कोलकत्यात गुजराती, पंजाबी, मारवाडी असा पारंपारिक पेशाने व्यावसायिक असलेला वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेला मजूरवर्गही आहे. त्यांच्या अनेक पिढ्या कोलकत्यातच जन्मल्या आणि वाढल्या आहेत. आता आपण येथीलच असल्याचे ते मानू लागले आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या वर्गाने तृणमूल काँग्रेसच्या झोळीत भरभरून दान टाकल्याचे चित्र आहे. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर हा वर्ग समाधानी असल्याचे पक्षाचे आमदार सुजित बोस यांनी म्हटले आहे. 45 टक्के व्यावसायिक समाज वास्तव्याला असलेल्या बिधाननगर मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. गुंतवणूक आणि व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे शाश्वत योजना नसल्याचे पश्चिम बंगालमधील अनेक उद्योजकांचे मत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष ज्या राज्यांमध्ये सत्तेवर आहे त्याठिकाणी यादृष्टीने फार काही ठोस काम झाल्याचे दिसत नसल्याचे उद्योजकांचे मत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अपयश दाखवण्याची मोहिम राबवली.

भाजपने राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयीचे स्वतःचे धोरण सांगितले नाही. त्यामुळे यावेळी बंगालमध्ये भाजपचा विजय झाला तरी लगेचच त्या पक्षाचे नेते पुढील वर्षी ज्याठिकाणी विधानसभेच्या निवडणुका आहेत तिकडे लक्ष केंद्रीत करतील आणि बंगालला वाऱ्यावर सोडलेले असेल, अशी रास्त शंका उद्योजकांच्या मनात होती. त्याउलट ममता बॅनर्जी या कायमच जनतेसाठी उपलब्ध असतात आणि पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत असतात, असे बॉलीगंज येथील मेफेअर रस्त्यावरील रवी गौरीसारिया यांचे मत आहे. केवळ बंगाली भाषक नव्हे तर राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या हिंदी भाषकांनाही ममता बॅनर्जी यांच्याविषयी आपुलकी वाटते.

बॅनर्जी यांनी राज्यात हिंदी विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या हिंदी भाषक आघाडीची त्यांनी फेररचना केली असून आघाडीचे प्रमुख विवेक गुप्ता हे जोरासांको मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त याच मतदारसंघातून भाजप उमेदवाराने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता. यावेळी भाजपने सावधगिरी म्हणून उमेदवार बदलताना राहुल सिन्हा यांना वगळून मीनादेवी पुरोहित यांना उमेदवारी दिली होती. तरीही तृणमूलचे विवेक गुप्ता येथून 13,000 मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

2019 मध्ये आम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी मतदान केले मात्र यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी केले, असे जोरासांको येथील व्यापारी रामसरन सुरेका सांगतात. ते म्हणतात, उद्योग-व्यवसायासाठी भाजप शासित राज्यांसह देशात कुठेच चांगली परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यात भाजप सत्तेवर आल्यास उद्योग-व्यापारासाठी चांगले वातावरण तयार होईल हे म्हणणे कुणीच मनावर घेतले नाही, असे त्यांचे मत आहे. महिलांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामध्ये कोलकत्यातील व्यवसाय-उद्योग करणाऱ्या महिलांचाही समावेश होतो. आमच्या सारख्या महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक ती सकारात्मकता ममता बॅनर्जी यांनी तयार केली असल्याचे मणिकाटला मतदारसंघातील आरूषी सारिया यांचे मत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.