निलंबित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍तीवरून सत्ताधारी, प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

लाचखोरांना सामावून घेण्याच्या प्रकारामुळे पालिकेत भ्रष्टाचार बोकाळणार?

पिंपरी – अत्यंत गंभीर प्रकारची कृत्ये, लाचखोरीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 16 कर्मचाऱ्यांना एकाच आदेशाने मनपा सेवेत रुजू करण्यात घेण्यात आल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नेते, आयुक्‍त आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या विरोधात संघटनांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

लाखो रुपयांची लाच घ्या, फौजदारी गुन्हे दाखल असू द्यात, कोणतीही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला कामावर रुजू करून घेऊ, असाच संदेश पालिका आयुक्‍तांच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये गेला आहे. काही सामाजिक संघटनांनी आयुक्‍तांच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात 2 कोटींहून अधिक रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

सत्ताधारी भाजपाच्या पक्षनेत्यांनी यापासून आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी एवढा मोठा निर्णय हा सत्ताधाऱ्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय राबविलाच जावू शकत नसल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. एका बांधकाम व्यवसायिकाकडून लाच घेणारे राजेंद्र शिर्के, बिलांसाठी लाच घेणारे किशोर हिंगे तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी अलका कांबळे, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. महापालिकेत सर्वाधिक गाजलेली ही प्रकरणे असतानाही सरसकट सर्वांनाच कामावर रुजू करून घेण्याचा आयुक्‍तांचा निर्णय हा आत्मघातकीच सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षाची भूमिकाही संशयास्पद

महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडूनही या विषयावर आवाज उठविला जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. सामाजिक संघटना, कार्यकर्ते या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाईच्या तयारीत असताना केवळ दत्ता साने यांनी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडून कोणीच बोलत नसल्याने संशय निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचेही रेकॉर्ड मोडले

यापूर्वी सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेत आलेल्या भाजपच्या काळात तब्बल 16 निलंबित कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी कामावर रुजू करून घेत भ्रष्टाचाराचा नवीन इतिहास रचल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यापूर्वीही ठेकेदारांबाबत असे भ्रष्ट निर्णय घेत भाजपाने आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×