शिराळा (प्रतिनिधी) – विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले असून कोणत्याही क्षेत्राची प्रगती, भविष्य, भूतकाळ व संशोधन याची माहिती घरबसल्या मिळत आहे. या प्रवाहत आपण कोठे आहोत, याचे भान असणे गरजेचे आहे. शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाचा समावेश असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील उर्दु शाळा क्रमांक 4 चे मुख्याध्यापक मुस्ताक मोमीन यांचा जिल्हा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, विश्वासचे संचालक विश्वास कदम, नगराध्यक्ष अर्चना शेटे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, नगरसेवक गौतम पोटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. नाईक म्हणाले, शिक्षणाचे विविध मार्ग निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचा कल ओळखून पालकांनी त्यांना त्या क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने बलत्या काळाबरोबर रहाणे क्रमप्राप्त बनले आहे. उर्दू शाळेतील मुख्याध्यापकांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला, यावरून शाळेची प्रगती लक्षात येते.
यावेळी साधना पाटील, शाकीरा पठाण, मुख्याध्यापक मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. आसमा शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमास संजय हिरवडेकर, प्रतिभा पवार, सुनिता निकम, मोहन जिरंगे, केंद्रप्रमुख सुहास रोकडे, माजी सरपंच देवेंद्र पाटील, माजी उपसरपंच सुनील कवठेकर, के. वाय. मुल्ला, के. आर. पठाण, सरदार पठाण, दिलावर मोमीन, खलील मोमीन, बसवेश्वर शेटे, राजेंद्र निकम, बाबलाल मुजावर, डॉ. अजिम मुल्ला उपस्थित होते.