औरंगाबाद – शेजारच्याचा व्यवसाय बंद पाडण्याच्या हेतूने करणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी बद्रीनाथ बांडे यांचे पैठण तालुक्यातील बिडकीन येथे निलजगाव रोडवर श्रीहरी ट्रेडर्स नावे दुकान आहे. दरम्यान, कामगार सकाळी दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला दुकानासमोरील काट्यावर काळ्या रेषा मारलेले नारळ, लिंबू आणि भाकर ठेवलेल्याचे दिसले. त्याने बांडे यांना याबाबत माहिती दिली असता बांडे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात सदर घटनेप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक व्यक्ती रात्रीच्या वेळी बांडे यांच्या दुकानासमोर येऊन काट्यावर पिशवीतील वस्तू टाकत असल्याचे दिसत आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत.