वायरलेस इअरबड्‌स

बदलत्या काळानुसार ज्या प्रमाणे मोबाईलचे रंगरूप बदलत गेले, अगदी त्याच प्रमाणे मोबाईल सोबत मिळणाऱ्या ऍक्‍सेसरीजने देखील वेळोवेळी कात टाकत स्वतःला अपडेटेड ठेवले आहे. स्मार्टफोन म्हटलं की त्याच्यासोबत एका ऍक्‍सेसरीचं नाव प्रामुख्यानं जोडलं जातं, आणि ती ऍक्‍सेसरी म्हणजे इअरफोन! ज्या प्रमाणे सध्या मोबाईलचा स्मार्टफोन पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे अगदी त्याचप्रमाणे वायर्ड हेडफोन्सपासून ते वायरलेस इयरबड्‌स पर्यंतचा इअरफोनचा प्रवास देखील रोमांचक आहे.

वायर्ड हेडफोन्समध्ये असणाऱ्या वायरमुळे अशा प्रकारचे हेडफोन्स वापरताना युजर्सला वायरचे बर्डन सहन करावे लागत असे मात्र कालानुरूप वायर्ड हेडफोन्सची जागा ब्लूटूथ हेडफोन्सने घेतली. अशा नव्या जमान्याचा ब्लूटूथ हेडफोन्समध्ये देखील ओव्हर द नेक, ओव्हर द हेड आणि इअरबड्‌स असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील इअरबड्‌स हा सर्वाधिक आधुनिक हेडफोन्सचा प्रकार असून यामध्ये कोणत्याही प्रकारची वायर अथवा क्‍लिप वापरण्यात येत नाही. केवळ दोन कानांसाठी दोन बड्‌स अशी साधी सोपी रचना असलेले हे इअरबड्‌स सध्या तरुणाईला आकर्षित करत आहेत.

तसं पाहायला गेलं तर इअरबड्‌स पहिल्यांदा मार्केटमध्ये उतरविण्याचा मान ऍपल या जगप्रसिद्ध टेक्‍नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीचा आहे. तरुणाईमध्ये या गॅजेटबाबत प्रचंड क्रेझ असताना देखील ऍपलच्या इअरबड्‌सची किंमत खिशाला परवडण्याजोगी नसल्याने इअरबड्‌सचे यूजर्स लिमिटेड होते. मात्र आता इअरबड्‌सच्या शर्यतीत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला असून त्यामुळे त्यांची किंमत तरुणाईच्या ‘पॉकेट मनिला’ परवडेल अशी झाली आहे.

सध्या बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे इअरबड्‌स उपलब्ध असून त्यांची किंमत अगदीच एक हजारापासून ते वीस हजारांपर्यंत आहे. परवडण्याजोगी किंमत झाल्याने तरुणाईला या इअरबड्‌सने झपाटून टाकल्याचे चित्र आहे. जिममध्ये वर्कआउट करताना, ट्रॅव्हल करताना हे इअरबड्‌स कोणत्याही वायरच्या टेन्शनशिवाय सहजपणे वापरले जाऊ शकतात.

– ऋषिकेश जंगम

Leave A Reply

Your email address will not be published.