जकार्ता : इंडोनेशियन सुरक्षामंत्री विरांटो यांच्यावर गुरुवारी एका हल्लेखोराने चाकू हल्ला केला. एका वाहनात शिरत असताना विरांटो यांना भोसकण्यात आले.या हल्ल्यात विरांटो यांना दोन खोल जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे.
हा हल्ला जावा बेटावरील पांडेग्लंगमध्ये झाला. एका व्यक्तीने विरांटो यांच्या अगदी जवळ येऊन त्याच्यावर हल्ला केला,असे राष्ट्रीय पोलिस प्रवक्ते देडी प्रसेत्यो यांनी सांगितले. या हल्ल्याबद्दल एका पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
72 वर्षांच्या विरांटो यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा अधिकारी या जोडप्याला स्थानिक विद्यापीठाबाहेर मैदानात ओढत घेऊन जाताना, न्यूज चॅनेलवर दिसून आले आहे. विरांटो हे माजी लष्करी अधिकारी आहेत.
त्यांना दोन गंभीर जखमा झाल्या आहेत पण त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना तातडीने राजधानी जकार्ता येथे नेण्यात येईल आणि शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, असे बर्काह इस्पितळातील प्रवक्ते फिर्मनस्या यांनी सांगितले.