संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

अधिवेशनात 27 विधेयके मंजूरीसाठी सादर होणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यात प्रामुख्याने देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्‍मीरमधील सध्य परिस्थिती तसेच, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्दयांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व राष्ट्रीय मुद्दयांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले आहे.

बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय (हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे तसेच हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच संमत केले जाण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात केंद्र सरकारने वटहुकूम काढलेला आहे. इलेक्‍टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही वटहुकूम काढलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना केंद्र सरकारने बेकायदा नजरकैदेत ठेवले असून त्यांना संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची अनुमती देण्याची मागणी कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी केली. सध्या तुरुंगात असलेले कॉंग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनाही अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी कॉंग्रेसने केली.

हिवाळी अधिवेशन 13 डिसेंबपर्यंत चालणार असून त्यात 27 विधेयके मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 28 विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्‍मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक, अवैध कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक मंजूर करून व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा हक्क तपास यंत्रणांना देण्यात आला होता. 26 नोव्हेंबर रोजी संसद संविधान दिवस साजरा करणार असून त्यानिमित्त एक दिवसाचे संयुक्त अधिवेशन घेतले जाईल. राष्ट्रपती रामनाथ किोवद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे होतील.

मांडली जाणारी महत्त्वाची विधेयके : व्यक्तिगत माहिती संरक्षण, तृतीयपंथीयांचे हक्कव संरक्षण, इलेक्‍ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)