winter session 2022 – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूकडील आमदार एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. याचाच प्रत्यय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ विधानसभेमध्ये बोलत असताना आला. भुजबळ रस्ते वाहतुकीबाबत बोलत असताना त्यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याची कोंबडी असा केला. भुजबळ यांच्या याच वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं.
भुजबळ यांनी मुंबईबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत व मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी लावून धरली. सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करताना भुजबळ यांनी मुंबईबाबत वापरलेला शब्द लगेच मागे घेतला आहे हवं तर रेकॉर्ड तपासा असं म्हंटल. अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतरही सत्ताधारी पक्षाचे आमदार ऐकून घेण्याच्या भूमिकेत नसल्याचं दिसताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान झाला तेव्हा तुम हि कोठे होता? असा सवाल केला.
तालिका अध्यक्षांनी दोन्ही बाजूच्या आमदारांना शांत राहण्याच्या सूचना केल्यानंतरही हा गदारोळ सुरूच होता. अखेर तालिका अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र १० मिनिटांनंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानं तर देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले.