राजेगावात ऊसतोड कामगारांची उबदार थंडी
राजेगाव – दिवाळीला जाणवणारी थंडी यंदा जाणवलीच नाही. मात्र, सध्या खेड आणि परिसरात थंडी आणि त्याचबरोबर धुक्याची चादर पसरू लागली आहे. पाऱ्यात घसरण होऊन थंडीत हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या दिसू लागल्या आहेत. राजेगाव (ता. दौंड) येथे आता ऊसतोड कामगारांच्या राहुट्या पडल्या आहेत. येथे मोठ्या संख्येने अशा शेकोट्या दिसणार आहेत.
यावर्षे परतीच्या पावसाने खूप उशिरापर्यंत म्हणजे दिवाळी झाल्यावरही हजेरी लावली. नोव्हेंबरच्या सुरुवातीस तापमानात किमान तीन अंशाची घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आला होता. यादरम्यान दोन तीन वेळा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाला, त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे आणि काही दिवसांत हेच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. खेडसारख्या ग्रामीण भागात गहू, हरभरा तसेच थंडीच्या मदतीने येणाऱ्या पिकांना फटका बसू नये अशी अनेक गणिते शेतकऱ्यांनी आखलेली आहेत.
गावोगावी शेकोट्या पेटणार!
थंडीच्या आगमनाची चाहूल लागताच राजेगाव व परिसरात ऊसतोड मजुरांच्या शेकडो टोळ्या दाखल झाल्या आहेत.गुलाबी थंडी असली तरी उघड्यावर असणाऱ्या या संसारांना उबदार करण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटताना आता दिसणार आहेत. ग्रामीण भागात या शेकोट्या प्रत्येकाला आल्हाददायक वाटतात.