Winter Cup Premier League : पुणे सॅटेलाईट संघाला विजेतेपद…

पुणे, – रोटरी डिस्ट्रिक ३१३१ यांच्या तर्फे रोटरी डिस्ट्रिक्ट विंटर कप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पुणे सॅटेलाईट संघाने लवास रॉयल्स संघाचा १६ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
स्केल अप क्रिकेट मैदान या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना पुणे सॅटेलाईट संघाने २० षटकात ९ बाद १६१ धावा केल्या. यात देवदत्त देवकर ४९, समाधान दांडेकर ३८, महेश घोरपडे २२, अनिल मांडके १६, विवेक गड्डम १८ यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. लवास रॉयल्सकडून किरीट पाटील (३-२३), सचिन समाल (२-१४), योगेश वाघ (२२७) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
याच्या उत्तरात लवास रॉयल्स संघाचा डाव १८.१ षटकात सर्वबाद १४५ धावावर संपुष्टात आला. यात मृगेंद्र पाटील ५५, सचिन समाल नाबाद ३४, विक्रम कैया १८ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुणे सॅटेलाईटकडून केशव वाईकर (२-९), महेश घोरपडे (१-९), भालचंद्र कुलकर्णी (१-२०) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
स्पर्धेतील विजेत्या संघाचा करंडक पुणे सॅटेलाईटचा कर्णधार महेश घोरपडे यांनी स्विकारला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे क्रिडा संचालक शशांक फडके यांच्या हस्ते करण्यात आले.





