पुणे, दि. 11 -राज्यासह पुण्यातील तापमानात रविवारपर्यंत 3 अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढणार आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असले, तरी पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल जाणवत आहे. राज्याच्या बहुतांशी शहरांचे तपमान कमी झाले आहे. असे असताना उद्या 11 नोव्हेंबरपासून राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यात तापमान घसरले आहे. विदर्भात किमान तापमान स्थिर आहे. परंतु रविवारपर्यंत राज्यातील तपमानात 3 अंशांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील 3 दिवसांत राज्यात 3 अंशांपर्यंत तापमानात घट होणार असल्याने थंडीचा कडाका वाढणार आहे. दुपारच्या कमाल तापमानातही फरक पडेल. ही थंडी रब्बी पिकांना पोषक आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यातही गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा किंचित घटला आहे. आज शहरात कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, थंडीचा कडाका जाणवू लागताच, स्वेटर, कानटोपी, हातमोजे यांसारख्या ऊबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.