कोलार – कर्नाटकातील कोलारमधील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात शनिवारी हिंसाचार झाला होता. वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी अन्य वस्तुंबरोबर फर्निचरचीही तोडफोड केली होती. यामध्ये 440 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून हजारो आयोफोन्सची लूट करण्यात आली असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पोलिस आणि कामागार खात्याकडे केलेल्या तक्रारीत कंपनीने हे म्हटले आहे.
कोलार जिल्ह्यातील नारासापुरा इथे इंडस्ट्रीयल एरियामध्ये आयफोनचा हा प्रकल्प आहे. पोलिसांनी याप्रकरणी 125 जणांना अटक केली आहे.
कर्मचारी तोडफोड करत असल्याचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या गुडविलला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या हिंसाचारामध्ये कर्मचारी इमारतीच्या काचा, सीसीटीव्ही, पार्किंगमधल्या कार्सच्या काचा आणि लाईट्स फोडताना दिसत आहेत. लोखंडी रॉडने करण्यात आलेल्या या तोडफोडीत सहा गाड्यांचं नुकसान झालं आहे. तसंच बॅटरीला आग लावण्यात आली. याशिवाय सुरक्षारक्षक आणि मॅनेजरला मारहाण करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.