विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : पात्रता फेरीतच रामकुमार पराभूत

विम्बल्डन – भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू रामकुमार रामनाथन याला विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पात्रता फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. चुरशीच्या लढतीत त्याला पोलंडच्या कामिल माजर्झाक याच्याकडून हार मानावी लागली. हा सामना कामिल याने 7-6 (7-5), 6-3 असा जिंकला.

जागतिक क्रमवारीत कामिल याला 111 वे स्थान आहे. रामकुमार याला 154 वे स्थान आहे. खोलवर सर्व्हिस व फोरहॅंडचे ताकदवान फटके मारण्याबाबत रामकुमार याची ख्याती आहे. त्याच्या जोरावर त्याने डेव्हिस चषक स्पर्धांमध्ये अनेक वेळा आश्‍चर्यजनक विजयांची नोंद केली आहे. कामिल याने त्याच्या वेगवान खेळास तितक्‍याच जोराने प्रत्यत्तर दिले. पहिला सेट त्याने टायब्रेकरद्वारा जिंकला. पुन्हा दुसऱ्या सेटमध्ये त्याने बेसलाईन व्हॉलीज व पासिंग शॉट्‌स असा बहारदार खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली.

रामकुमार हा 2015 पासून या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला विजयाने हुलकावणी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.