विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : विजेतेपदासाठी सेरेनापुढे हॅलेपचे आव्हान

विम्बल्डन – कारकिर्दीतील विक्रमी विजेतेपदासाठी सेरेना विल्यम्स या 37 वर्षीय खेळाडूला येथील विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत 27 वर्षीय खेळाडू सिमोना हॅलेपचे आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे आज होणार असून त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सेरेनाने आतापर्यंत या स्पर्धेत एकेरीत सात वेळा अजिंक्‍यपद मिळविले असून ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये तिने 23 विजेतेपदे पटकाविली आहेत. ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम लढतींमध्ये नेहमीच तिचा वरचष्मा राहिला आहे. हॅलेपने पाचव्यांदा ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले असले तरी फक्त एकदाच तिला अजिंक्‍यपद घेता आले आहे. तिने 2018 मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती.

उपांत्य फेरीत या दोन्ही खेळाडूंनी एकतर्फी विजय मिळविल्यामुळे चाहत्यांना अपेक्षित असा रंगतदार खेळाचा आनंद घेता आला नाही. सेरेनाने अंतिम फेरी गाठताना बार्बरा स्ट्रायकोवा हिचे आव्हान 6-1, 6-2 असे सहज संपविले होते तर हॅलेपने एलिना स्वितोलिना हिची अनपेक्षित विजयाची मालिका 6-1, 6-3 अशी खंडित केली होती.

सेरेना व हॅलेप यांच्यात आतापर्यंत 11 वेळा सामने झाले आहेत. त्यापैकी नऊ वेळा सेरेनाने विजय मिळविला आहे. 2014 च्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत हॅलेपने तिला हरविले होते तर 2015 मध्ये इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेत सेरेनाला दुखापतीमुळे तिच्याविरूद्ध माघार घ्यावी लागली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.