पुणे – केवळ प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर करोनावर यशस्वी मात करता येते हे दर्शवणारी आणखी एक घटना कात्रज भागातील एका 62 वर्षीय महिलेने दाखवून दिली आहे. रजनीताई गुलाबराव खटाटे असे या महिलेचे नाव आहे.
त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची टेस्ट करण्यात आली. तसेच फुफ्फुसाचा एक्सरे काढण्यात आला. त्यावेळी त्यांना न्युमोनियाचाहीं विकार झाल्याचे निदान झाले. व त्यांचे फुफ्फुस केवळ 20 टक्के इतकेच कार्य करीत असल्याने त्यांना तातडीने व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या ठिकाणी दाखल करण्याची सुचना करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात बेड मिळवण्यासाठी बरीच धावाधव केली. त्यात त्यांना बऱ्याच ठिकाणी नकार आला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा धीर सुटला. त्यांची ऑक्सिजनची लेव्हल 80 च्याही खाली गेली होती. त्यामुळे अनेकांना अश्रु अनावर झाले. पण या महिलेने अत्यंत धीरोदात्तपणे आपल्याच नातेवाईकांना धीर देत मला काहीही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका असे समजावले.
तोपर्यंत त्यांचे एक नातेवाईक प्रविण नांदगुडे यांनी धावाधाव करून त्यांच्यासाठी एका रूग्णालयात जागा मिळवली होती. तेथे त्या दाखल झाल्या. ऑक्सिजनची सोय त्यांच्या नातेवाईकांनीच केली. केवळ 20 टक्के कार्यरत असलेल्या फुफ्फुसाच्या आधारेच त्या श्वसन करीत होत्या. त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज चार दिवसांत टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. पाचव्या दिवशी त्यांचा ऑक्सिजन काढून टाकण्यात आला, इतकी त्यांच्या प्रकृतीत विलक्षण सुधारणा झाली होती. सदर महिला सहाव्या दिवशी सुखरूप स्वताच्या पायाने चालत घरी आली,तेव्हा नातेवाईकांनी निश्वास टाकला. या अत्यंत जिकीरीच्या व धोक्याच्या काळात रजनीताईंनी मात्र स्वताच्या मनाचा तोल अजिबात ढळू दिला नव्हता. मी सुखरूप घरी येणार आहे अजिबात काळजी करू नका हे वाक्य त्यांनी इच्छाशक्तीच्या बळावर खरे करून दाखवले आहे.