उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? अजित पवार म्हणाले… 

मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज सायंकाळी होत असून त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. तसेच मी आज शपथ घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सिल्वर ओकवरील बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले कि, उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे असे प्रत्येकी दोन-दोन मंत्री शपथ घेतील. राष्ट्रवादीतर्फे छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचा शपथविधी आज होईल. तर अन्य मंत्र्यांचे शपथविधी विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडीनंतर होईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली होती. मात्र मी आज शपथ घेणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. तर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी अजित पवार आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अजित पवार यांनी नकार दर्शविला.

मी बंड केलं नव्हतं. मी एक भूमिका घेतली होती. मी अजिबात नाराज नाही. मला जे बोलायचे ते योग्यवेळी सविस्तर बोलेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडीचं मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्री पदासह 16 मंत्रिपद, राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील. उदय सामंत, संजय राठोड, अनिल परब, यांची नावं निश्‍चित समजली जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.