यंदाही कीर्तीकर विजय मिळवणार का?

एकूणच मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी वायव्य किंवा उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या वेळी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांनी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. अर्थातच त्याचे श्रेय मोदी लाटेला दिले गेले. यावेळी कीर्तीकर हा मतदारसंघ राखण्यात यश मिळवतात का हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे संजय निरूपम निवडणूक लढवत आहेत. वास्तविक उत्तर मुंबईतून निरूपम यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तेथे भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्यामुळे निरूपम यांनी वायव्य मुंबईतून उमेदवारीची मागणी केली आणि ती हट्टाने मिळवली देखील. संजय निरूपम हे पूर्वी शिवसेनेत होते. ते कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची अतिशय उर्मटपणे वागण्याच्या पद्धतीने मुळातच सर्वसामान्य मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. भाजपवर, पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांची जीभ कायम घसरते. त्यामुळे अनेकदा ते टीकेचा विषय बनले आहेत. अलीकडेच त्यांच्याकडून मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. आता वायव्य मुंबईतून निवडणूक लढवताना त्यांना कोण कशी साथ देणार आहे, हा एक प्रश्‍न आहे.

हा मतदारसंघ कॉंग्रेसचे दिवंगत नेते गुरूदास कामत यांचा होता. संजय निरूपम यांनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना कामत आणि त्यांच्या समर्थकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. कामत यांचे कार्यकर्ते ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे निरूपम यांच्या प्रचारापासून लांब राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यास झालेला विलंब, कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी यामुळे निरूपम यांच्यासाठी ही निवडणूक चांगलीच अवघड ठरणार आहे.

भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. निरूपम यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवसैनिकांच्या दृष्टीने निरूपम यांचा वचपा काढायची संधी आपसूकच मिळाली आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. या भागात कीर्तीकर यांच्याबद्दल आदर आहे. शिवाय स्थानीय लोकाधिकार समिती, कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. शिवाय या लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजप-शिवसेनेकडे आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 3 आमदार, 38 नगरसेवक आणि 4 मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी उतरली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते सर्व मतभेद विसरून कीर्तीकर यांचा प्रचार करत आहेत. गेल्या निवडणुकीत कीर्तीकर पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले होते. ही आघाडी राखण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनापासून प्रचार करत आहेत.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदार संमिश्र आहेत. इथे जशी उच्चभ्रू वस्ती आहे, तशीच म्हाडा वसाहती, कोळीवाडे, झोपडपट्टीही आहे. थोडक्‍यात संमिश्र लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या सहा लाख आहे, त्याखालोखाल उत्तर भारतीय तीन लाख 65 हजार आणि मुस्लीम तीन लाख 45 हजार आहेत. मराठी मतदारांच्या खालोखाल उत्तर भारतीय आणि मुस्लिमांचे इथे प्राबल्य आहे. गुजराती आणि मारवाडी समाजाचेही दोन लाख मतदार येथे आहे. मात्र या मतदारसंघात 45 ते 50 टक्‍क्‍यांवर कधी मतदान झालेले नाही. त्यामुळे इथली लढत ही नेहमी चुरशीचीच असते.

गेल्या निवडणुकीत कीर्तीकर यांचा विजय तुलनेने सोपा होता कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्तेही त्यांच्यासाठी झटले होते. पण गेल्या पाच वर्षांतील भाजप आणि शिवसेनेतील कलगी तुऱ्यामुळे नाही म्हटले तरी भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात होते. पण कीर्तीकर यांनी भाजपलाही आपल्याबरोबर घेण्यात यश मिळवले आहे. याही वेळी आपणच निवडून येणार असे ते आत्मविश्‍वासाने सांगतात.

2009मध्ये या मतदारसंघातून कॉंग्रेसचे गुरूदास कामत निवडून आले होते. पण त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली. संजय निरूपम, कृपाशंकर सिंह आणि कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी याही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पण पक्षश्रेष्ठींनी संजय निरूपम यांच्या बाजूने कौल दिला. निरूपम हे पूर्वी शिवसेनेत होते. निरूपम यांचा या मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. त्या जोरावर युतीची मते आपण खेचून आणू असा दावा निरूपम करतात. गेल्या वेळी मनसेच्या उमेदवारालाही 66 हजार मते मिळाली होती. यावेळी मनसे निवडणुकीत नाही. आता ही मते कुणाच्या पारड्यात जातात हे पहावे लागेल.

या मतदारसंघात अंधेरी पूर्व, अंधेरी पश्‍चिम, वर्सोवा, जोगेश्‍वरी पूर्व, गोरेगाव, दिंडोशी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ असा वायव्य मुंबई मतदारसंघ होता. आता या मतदारसंघाचे उत्तर पश्‍चिम आणि उत्तर मध्य असे दोन मतदारसंघ झाले.

1984, 1989 आणि 1991, 1999, 2004 मध्ये सुनील दत्त आणि त्यांच्या निधनानंतर प्रिया दत्त खासदार म्हणून येथून निवडून आले. 2004मध्ये संजय निरूपम शिवसेनेत होते. त्यावर्षीच्या निवडणुकीत संजय निरूपम यांनी सुनील दत्त यांना अटीतटीची लढत दिली होती. एरवी मोठ्या फरकाने निवडून येणाऱ्या सुनील दत्त यांना त्यावर्षी केवळ 47 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. आता निरूपम कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कीर्तीकरांना ते चांगली टक्कर देऊ शकतील असा विश्‍वास कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटला नसता तरच नवल होते. कॉंग्रेसचा कायम झोपडपट्टीवासीयांच्या मतांवरच भिस्त राहिली आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मराठी मतदारांची संख्याही मोठी असून शिवसेनेला म्हणूनच हा मतदारसंघ आपला वाटतो. कीर्तीकर यांनी खासदार म्हणून केलेल्या कामांची यादीच सादर केली आहे. त्यात पश्‍चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडीसाठी सहावी लाईन या महत्त्वाच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय वेसावे समुद्रातील गाळ काढण्यासाठी निधी, देशातील स्मार्ट रेल्वे स्थानकांमध्ये अंधेरी-गोरेगावचा समावेश, रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवल्याचा दावा कीर्तीकर करतात.

कीर्तीकर यांना आपणच निवडून येणार याची खात्री आहे. कॉंग्रेस आपला हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काय व्यूहरचना करते यावर इथली निवडणूक अटीतटीची होणार की एकतर्फी हे ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.