विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकणार- राधाकृष्ण विखे

निळवंडेला विरोध करणारे कोण आहेत हे जनतेला समजले

नगर: लोकसभा निवडणुकीत युतीला दोन्ही जागा मिळवून दिल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत 12 च्या 12 जागा युतीला मिळविणार असल्याचा विश्‍वास माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. तसेच राज्यात मुख्यमंत्री यांचे काम चांगले असून ते शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. जिल्ह्यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरूवारी विखे पाटील यांनी निळवंडे प्रश्‍नी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील म्हणाले, निळवंडे कालव्यासाठी माझ्या तालुक्‍यातील जमिनीचे भू संपादन झालेले आहे. संगमनेर तालुक्‍यातील काही जमिनीचे संपादन बाकी असून निळवंडेला विरोध करणारे कोण आहेत हे जनतेला समजले आहे. यामुळेच उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याचे विखे यांनी सांगितले.

निळवंडेचे तारणहार आम्हीच आहेत, असे सांगणारे संगमनेर अकोल्याचे पुढारी कोठे आहेत. लोकांची डोकी भडकविण्याचे काम करणारे आणि बंदीस्त पाईपची मागणी करत आहेत. त्यांच्याकडून जनतेचा बुध्दीभेद करण्यात येत असल्याचा आरोप विखे यांनी यावेळी केला. निळवंडे कालव्याचे कामाला विलंब नको अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आतापर्यंत निळवंडे कालव्याच्या प्रश्‍नावर आमची बदनामी केली. निळवंडेचा प्रश्‍न धरणाच्या सुरूवातीपासून सोडवायचा की टेलपासून, पाणी कधी उलटे वाहते? निळवंडे प्रश्‍नी सातत्याने आमच्या विरोधात षडयंत्रे रचन्यात आलीत. यात राज्यातील नेतृत्वाचा सहभाग असून आजमात्र निवळवंडेला विरोध करणारे उघडे पडले असून, जनतेला झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, हे समजले असल्याची टीका राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच थोरात-पिचड यांचे नाव न घेता निळवंडेचे तारहाण आम्हीच आहोत, असे सांगणारे संगमनेर-अकोल्याचे पुढारी आता कुठू आहेत, असा सवाल उपस्थित केला.

तसेच लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीला दिल्या असून यात समाधानी आहे. या निवडणुकीत राज्याचे नेते म्हणणाऱ्यांचे काय झाले. हे सर्वांना माहीत असल्याचा टोला आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 12- 0 होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असून, युतीचा ऐतिहासिक विजय होणार असल्याचेही राधाकृष्ण विखे म्हणाले.


पाणी प्रश्‍न समन्वयाने सोडवणे आवश्‍यक

नगरसह राज्यात पाणी प्रश्‍नावरून वाद निर्माण करण्यापेक्षा हा प्रश्‍न समन्वयाने सोडवेण आवश्‍यक आहे. सरकारने गोदावरी जलआराखडा तयार केल्यानंतर बरेच प्रश्‍न समोर आली असून ते सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करले. यासाठी पश्‍चिम खोऱ्यात वाहून जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात आणणे आवश्‍यक आहे. तसेच पाण्याचा अग्रक्रम ठरविणे आवश्‍यक असून समुद्राला जाणारे 110 टिएमसी पाणी परत आणणे आवश्‍यक आहे. ज्या प्रमाणे राज्य सरकार बोगदे पाडून महामार्ग तयार करत आहेत, त्याच धर्तीवर बोगदे पाडून एकीकडून दुसरीकडे पाणी आणता येईल, यासाठी प्रयत्न व्हावेत.


शेवटचे आवर्तन पोलीस संरक्षणात सोडावे

राज्यातील पाणीप्रश्‍न दिवसंदिवस गंभीर होणार आहे. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात हा प्रश्‍न महत्वाचा आहे. नगर जिल्ह्याचे कुकडीचे 14 टीएमसी पाणी पळविले गेले. कुकडीचे शेवटचे आवर्तन पोलीस संरक्षणात सोडावे लागले. कुकडीचे 75 टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात असल्याने कुकडीचे कार्यालय नगर जिल्ह्यात आण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सरकारने पाणी सामान न्याय वाटपाकडे गंभीरपणे पाहवे आणि ते समन्वयातून व्हावे, याकडे लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.