पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हद्दवाढीनंतर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली पुणे महापालिका सर्वांत मोठी ठरली आहे. शहरासह तरल लोकसंख्या गृहीत धरल्यानंतर तब्बल ८० लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ टीएमसी पाण्याची गरज आहे. या मागणीचे पाण्याचे अंदाजपत्रक महापालिकेने नुकतेच जलसंपदा विभागास सादर केले आहे.
मागील वर्षी पुणे शहरासाठी १२.८२ टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आला. तर, प्रत्यक्षात पाणीवापर १७ टीएमसी पेक्षा अधिक होता. त्यामुळे महापालिकेकडून वाढीव मागणी करण्यात आलेली असताना पुणेकरांना यंदातरी वाढीव पाणी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाढीव पाण्यासाठी दरवर्षी ३० जुलैपूर्वी पाण्याचे अंदाजपत्रक सादर करावे लागते. त्यानुसार महापालिकेने हे अंदाजपत्रक सादर केले आहे.
१३ वर्षांत अडीच टीएमसी वाढ
महापालिकेने २०११ पासून पाणीकोटा वाढविण्याची मागणी शासनाकडे केली सातत्याने केली आहे. जलसंपदा विभागाने शहरातील सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडल्यास पाणीकोटा वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महापालिकेने मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारला.
त्याद्वारे वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही २०११ पासून महापालिकेचा पाणी कोटा अवघा अडीच टीएमसी वाढला आहे. महापालिकेस २०१९ पर्यंत ११.५० टीएमसी पाणी मिळत त्यानंतर नव्याने करार झाले असून हा पाणीकोटा आता १२.८२ टीएमसी झाला आहे. त्यामुळे मागील १३ वर्षांत शहराची हद्द आणि लोकसंख्या दुपटीने वाढलेली असताना पाणी कोटा मात्र नगण्य स्वरूपात वाढत आहे.
राजकीय इच्छाशक्तीची गरज
विधीमंडळ अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी शहराची पाणीटंचाई तसेच पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी प्रत्यक्षात कोटा वाढवून मिळणार का? याबाबत साशंकता आहे.
महापालिकेने या पूर्वीच शासनाकडे मुळशी धरणातून ५ टीएमसी तसेच भामा- आसखेड धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी वाढवून मागितले आहे.
मात्र, शासन त्याकडे लक्ष देत नाही. उलट मुठा उजवा कालवा बंदिस्त करून त्यातून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे जे पाणी वाचणार आहे ते पुण्याला दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणी कोटा वाढवून मिळण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
जादा पाण्यासाठी ही दिली कारणे
– शहराची एकूण लोकसंख्या – ७९ लाख
– समाविष्ट गावांची लोकसंख्या – १८ लाख
– तरल लोकस्ंख्या ५ लाख
– पाण्याची गळती – ३५ टक्के ( सुमारे ७ टीएमसी)