मुंबई – राज्यातील अभूतपूर्व राजकीय गोंधळ कायम आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. मात्र न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ११ जुलै तारीख दिली आहे. त्यामुळे 10 जुलैपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकारला कुठलाच धोका नसल्याचं चित्र आहे.
आषाढी एकादशीला पंढपूरच्या विठ्ठलाची पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मात्र शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सरकार कोसळणार आणि नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच विठ्ठलाची पूजा करणार अशी चर्चा सुरू झाली होती. अनेक कार्यकर्त्यांनी तसे बॅनरही लावले होते. मात्र न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे यावर्षीची विठ्ठल पूजा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार असं चित्र आहे. पुढील महिन्यात १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
राज्यातील राजकीय वाद सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालयाने यावर स्पष्ट असे काहीही आदेश दिलेले नाहीत. न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या वकिलाला या प्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, अशी विचारणा केली. त्यावर हे प्रकरण गंभीर असून आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत असल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे म्हटले. तसेच न्यायालय हवे असल्यास फ्लोर टेस्टचे आदेश देऊ शकते, असंही वकिलांनी म्हटलं.
दरम्यान फ्लोर टेस्ट कधी घ्यायची याबाबत न्यायालयाने काहीही स्पष्ट केलं नाही. मात्र फ्लोर टेस्ट झाल्यानंतर काहीही गैर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे कायम खुले असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे फ्लोर टेस्ट कधी होईल, याबाबत काहीही ठाम सांगता येत नसून हा मुद्दा पुढील तारखेपर्यंत रेंगाळू शकतो, अशीही शक्यता आहे.