साताऱ्यात ‘तुतारी’ भाजपला धक्का देणार? जयंत पाटलांनी घेतली भाजप नेत्याची भेट; बंद दाराआड तासभर चर्चा

Jayant Patil | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना पक्षात आणून पवारांनी भाजपाला झटका दिला आहे. यानंतर आता साताऱ्यातील एका बड्या भाजप नेत्याच्या घरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे साताऱ्यातील नेते मदन भोसले यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली असून दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या भेटीत जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्यासमोर शरद पवार गटात येण्याचा प्रस्ताव मांडला असावा, अशी शक्यता आहे. या भेटीनंतर भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत असं सांगत जयंत पाटील यांनी भेटी बाबत बोलण्याचे टाळले. Jayant Patil |
मदन भोसले यांचे वाई तालुक्यात वर्चस्व आहे. वाईमधील विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेले, त्यामुळे महायुतीत ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर झालेली मदन भोसले आणि जयंत पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. Jayant Patil |
मदन भोसले हे शरद पवार गटात गेल्यास वाई मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचीही चर्चा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विविध रणनीती आखत आहेत. भाजपचे कोल्हापूरातील समरजितसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यापाठोपाठ भाजपतील नाराज हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू आहे. यात आता मदन भोसले यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
हेही वाचा:
तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद





