कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

पुणे – माथाडी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची झाली पाहिजे. याबाबत असलेली मागणी रास्त आहे. या मागणीसह कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, उपाध्यक्ष डॉ. हरिष धुरट, राजकुमार घायाळ, कोषाध्यक्ष नवनाथ बिनवडे, हनुमंत बहिरट, संतोष नांगरे, राष्ट्रीय हमाल पंचायतचे चंदनकुमार, पौर्णिमा चिकरमाने आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, जिल्हा मंडळात पुरेशी भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण देशात माथाडी कायद्याची स्तुती केली जात असताना काही लोक त्याची बदनामी करू पाहत असत. मुंबई, पुण्यात या कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा गैरवापर करू इच्छिणाऱ्यांना बाजूला ठेवले पाहिजे. जेणेकरून कायद्याची बदनामी होणार नाही. माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणार असून, कामगारांचे प्रश्‍न समजून घेऊन सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आढाव म्हणाले, मागील सरकारने कामगार कायद्याची वाताहत केली. त्यांना आता जनतेने घरी बसविले आहे. हा कायदा सन्मानित झाला पाहिजे. संपूर्ण देश हा कायदा स्विकारत असताना ज्या महाराष्ट्रात या कायद्याची निर्मिती झाली. त्या महाराष्ट्र या कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यास तयार नसल्याचे दुर्दैवी आहे. सुवर्ण महोत्सव साजरा केला पाहिजे. ज्याप्रमाणे माथाडी कायदा आदर्श बनला. त्याप्रमाणे पुण्यातील मार्केट कमिटी आदर्श बनली पाहिजे. कांदा, टोमॅटो अशा किमान काही वस्तुंना तरी हमीभाव मिळाला पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.