दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार : रोहित पवार

जामखेड (प्रतिनिधी ) : कर्जत जामखेड तालुक्‍यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आगामी काळात आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आणि त्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले.

जामखेड तालुक्‍यातील झिक्री इथे बारामती ऍग्रो लिमिटेड आणि उत्कर्ष मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्‍ट यांच्यावतीने दुग्ध उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला युवा नेते रोहित पवार उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्रिंबक कुमटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, उद्योगपती रमेश आजबे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, कॉंग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शरद शिंदे, यांच्यासह तालुक्‍यातील सर्व संचालक व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य व जामखेड तालुक्‍यातील दुध उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले, शेती हा व्यवसाय परवडणारा होण्यासाठी शेतीसोबतच दूध व्यवसाय, कुक्कुटपालन यांसारख्या जोड धंद्यांना प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेलं पीक दुष्काळामुळे डोळ्यासमोर जळून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर सध्या आली आहे. त्यामुळे शेतीसोबत जोडधंदा आवश्‍यक आहे. तसेच शेतीला पाणी आणण्यासाठीही पुढच्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. यातून शेतकऱ्यांची आर्थिक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. लहानपासूनच माझी शेतीशी नाळ जुळल्यामुळे या व्यवसायातील सगळ्या अडचणी मला माहीत आहेत. शेतकऱ्यांना तर दररोजच भेटून त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या हातात अधिकचे चार पैसे कसे येतील यासाठी माझा प्रयत्न आहे, मात्र त्याला तुमच्या सर्वांची साथ आवश्‍यक असल्याची साद मी यावेळी घातली. शेतकऱ्यांनी याला दिलेला प्रतिसाद पाहून पुढच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती नक्की बदलेल, असा मला ठाम विश्वास वाटतो प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दिनेश औटी यांनी शेतकऱ्यांना मुरगास या विषयावर तर डॉ. मनोज वटमवार यांनी मुक्त गोठा या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×