नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या करोनाला नियंत्रित करण्यासाठी करोना प्रतिबंधात्मक लसीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दरम्यान, आता लसीच्या दोन डोस नंतर तिसऱ्या बूस्टर डोससाठी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रक्रिया सुरु झाली आहे.तसेच भारतात देखील लसीकरणाचा विक्रम झाल्यानंतर आता तिसरा डोस देण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून करोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाणार आहे असे या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातात, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे.
ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे खराब झाली आहे ते दोन डोसच्या लसीकरणातून संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते. ऑक्टोबरमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या पॅनेलने गंभीर किंवा मध्यम प्रमाणात रोगप्रतिकारक कमी असलेल्या लोकांसाठी डब्ल्यूएचओ-सूचीबद्ध लसींच्या अतिरिक्त डोसची शिफारस केली होती.