जिल्हा परिषदेत राजकीय उलथापालथ होणार?

विधानसभा निकालानंतर मुहूर्त : राष्ट्रवादीचे भवितव्य धोक्‍यात

सातारा – आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या प्रमुख सत्तास्थानांपैकी जिल्हापरिषदेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता असून त्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतरच मुहुर्त ठरू शकतो. येत्या काळात जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचे भाजप अथवा शिवसेनेत प्रवेश झाले तर राष्ट्रवादीचे जिल्हापरिषदेतील भवितव्य धोक्‍यात येवू शकणार आहे. मात्र, राष्ट्रवादीने भविष्यातील धोका ओळखून मित्र पक्षांशी हातमिळवणी करण्याची तयारी ठेवली आहे.

अडीच वर्षापुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत एकूण 64 सदस्यांपैकी 40 सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. तर कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी 7, सातारा विकास आघाडी, कराड विकास आघाडी व शिवसेना प्रत्येकी 3 आणि अपक्ष 1 सदस्य निवडून आले होते. सद्यस्थितीत आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटणार आहे. आ.शिवेंद्रसिंहराजे यांचे सातारा तालुक्‍यात पाच, जावली तालुक्‍यात दोन तर कोरेगाव तालुक्‍यात एक सदस्य आहेत.

भविष्यात आठ सदस्यांनी पाठींबा काढला तर राष्ट्रवादीचे संख्याबळ 32 पर्यंत पोहचणार आहे. अशा स्थितीत विश्‍वास ठरावासाठी आवश्‍यक संख्याबळ राष्ट्रवादीकडे असणार आहे. मात्र, फलटणचा राजे गट शिवेसेनेचे शिवबंधन बांधण्याच्या चर्चा समोर येत आहेत. राजे गटाचे फलटण तालुक्‍यात सहा सदस्य आहेत. सहा सदस्यांनी विरोधाची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीचे संख्याबळ 26 वर पोहचणार आहे.

नेमके त्याचवेळी राष्ट्रवादीचे जिल्हापरिषदेतील भवितव्य धोक्‍यात येवू शकते. संभाव्य धोका ओळखून राष्ट्रवादीने कॉंग्रेसचे 7 आणि कराड विकास आघाडीचे 3 सदस्यांना सोबत घेण्याची तयारी ठेवली आहे. त्याबदल्यात सभापतीपदे देण्यात येणार आहेत. मात्र, हा प्रस्ताव कॉंग्रेस आणि आघाडीला मान्य असेल का, हे त्यावेळीच समोर येणार आहे. मात्र, ज्यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य संख्या 26 वर पोहचेल तेव्हा भाजप आणि कॉंग्रेस प्रत्येकी 7 , सातारा व फलटण राजेगटाचे 14 तर शिवसेना 3 अन अपक्ष 1 अशी एकूण 32 सदस्य संख्या होणार आहे. अशावेळी कराड आणि सातारा विकास आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

दोन पंचायत समिती भाजपकडे
दरम्यान, आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रवेशामुळे भाजपला आपसुक दोन पंचायत समितींचे गिफ्ट मिळाले आहे. सातारा आणि जावली पंचायत समितीवर आ.शिवेंद्रसिंहराजेंचे एकहाती वर्चस्व आहे. सातारा पंचायत समितीत 20 पैकी 11 सदस्य तर जावली पंचायत समितीमध्ये सर्व 6 सदस्य समर्थक आहेत. त्यामुळे येत्या काळात पंचायत समितीत पक्षश्रेष्ठींचे छायाचित्र बदलले जावू शकते. त्याचबरोबर येत्या काळात मेढा नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण होवू शकते.

सद्यस्थितीत 17 सदस्य संख्येत 3 संख्या असलेला शिवसेनेचा नगराध्यक्ष तर 7 संख्या असलेला आ.शिवेंद्रसिंहराजे गटाचा उपनगराध्यक्ष आहे. अपक्ष 6 आणि भाजपचे 1 सदस्याची शिवसेना नगराध्यक्षांना साथ आहे. मात्र, आता आ.शिवेंद्रसिंहराजे 7 आणि भाजप 1 असे संख्याबळ 8 होणार आहे. सत्तास्थापनेसाठी एका सदस्यांची आवश्‍यकता असणार आहे. अशावेळी आ.शिवेंद्रसिंहराजे सेना की अपक्ष गटाला सोबत घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.