मुंबई – गुढी पाडव्यानिमित्त मनसेचा शिवतीर्थावर पाडवा मेळावा होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यभरातून मनसे सैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. राज ठाकरे हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची वाटचाल कशी असणार यावर भाष्य करणार आहेत. तसेच सध्याचे राज्यातील राजकारण पाहता राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमधील मनसे कार्यालयाला भेट दिली.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यलायाला भेट दिल्याने शिंदे गट आणि मनसे यांच्यात युती होणार का ? अशा प्रकारच्या चर्च्यांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावेळी मनसेच्या कार्यालयामध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंना भगवी शाल देत त्यांचे स्वागत केले.
या भेटीबाबत बोलताना राजू पाटील म्हणाले,”आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी मीही उपस्थित होतो तेव्हा त्यांना आमच्या कार्यलयात येण्याचा आग्रह केला त्यांनी देखील ते मान्य केले आणि ते आले.” चोवीस तास कोणीही राजकारण करत नाही काही गोष्टी सलोख्याच्या आणि संस्कृतीच्या असल्याचे राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.
या मुद्द्यांवर काय बोलणार राज ठाकरे
शिंदे ठाकरे गटातील सत्तासंघर्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी निवडणूक
मनसेची आगामी वाटचाल आणि युती
राज्यात सुरु असलेले विविध क्षेत्रातील मोर्चे
सध्याचे शिंदे फडणवीस सरकार