चौथऱ्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला नेत्या आता गप्प का?

गायिका अनुराधा पौडवाल यांचा सवाल 

अहमदनगर: देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा घटना घडत असताना महिला संघटनांच्या नेत्या मात्र कुठेच विरोध करताना किंवा रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत नाहीत. धार्मिक स्थानांवरील महिलांच्या हक्कासाठी आंदोलने करणाऱ्या नेत्या आता गप्प का असा सवाल गायिका अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी अनुराधा यांनी शनिशिंगणापूरला येऊन शनीचे दर्शन घेतले. या वेळी अनुराधा यांनी चौथऱ्यावर न जाता खालूनच दर्शन घेतले. त्यानंतर पोलीस पाटील सयाराम बानकर यांच्या हस्ते त्यांचा ‘माहेरची साडी’ देऊन सत्कार केला. पौडवाल यांनी शनिदेवाला भाऊ मानले आहे. रक्षाबंधन व भाऊबीजेलाही त्या आवर्जुन येतात. त्यामुळे त्यांना ‘माहेरची साडी’ दिली जाते.

दरम्यन यावेळी अनुराधा यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी महिला संघटनांच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. चौथऱ्यावर चार पायऱ्या चढून जाण्यासाठी अट्टहास धरणाऱ्या महिला संघटना आज काय करत आहेत? देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत.

अशा परिस्थितीत या महिला नेत्या गप्प का आहेत? त्या तेथे जाऊन आवाज का उठवत नाहीत? त्यांना काहीच कसे वाटत नाही? महिला नेत्या केवळ धार्मिक स्थळी आंदोलन करतात. प्रसिद्धी मिळवतात. चार उंबरे ओलांडले म्हणजे महिलांचे प्रश्न सुटले असे नाही. खरी गरज महिला अत्याचार रोखणे, त्यांना सुरक्षा देणे ही आहे. महिला नेत्यांनी असा धाक निर्माण करावा की जेणेकरून अत्याचार करण्याचे धाडस निर्माण होणार नाही. असे काम महिला नेत्या का करत नाही?, अशी विचारणाही अनुराधा पौडवाल यांनी यावेळी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.