जपान संघटनेच्या सदस्यांचा पाठिंबा
माद्रिद -करोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा नव्या वेळापत्रतानुसार देखील झाली नाही तर ती आणखी लांबणीवर टाकण्यात येऊ शकते, असे संकेत जपान ऑलिम्पिक संयोजन समितीने दिले आहेत. मात्र, त्याचबरोबर जरी ही स्पर्धा लांबणीवर गेली तरीही सर्व सदस्यांचा या निर्णयाला पाठिंबा राहील, असेही समितीने जाहीर केले आहे.
ही स्पर्धा यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने या स्पर्धेला एक वर्ष पुढे ढकलण्यात आले. ही स्पर्धा आता नव्या वेळापत्रकानुसार 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. अर्थात, स्पर्धा एक वर्ष पुढे गेल्यामुळे जपान ऑलिम्पिक संघटनेला 2 अब्ज डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेचा फटका बसलेला आहे. आता ही स्पर्धा आणखी पुढे गेली तर हा तोटा 6 अब्ज डॉलर्स इतका वाढू शकतो. हा पैसा कसा उभा करायचा याचाच प्रश्न सध्या संघटना व जपान सरकारसमोर निर्माण झालेला आहे.
त्याचवेळी स्पर्धेला प्रायोजकत्व दिलेल्या कंपन्यांनी स्पर्धा झाली तरच करारातील रक्कम दिली जाईल, असे सांगितल्यामुळे त्यापूर्वी स्पर्धेच्या तयारीसाठी लागणारा निधी जपानच्या नागरिकांच्याच माथी मारला जाणार हे उघड आहे. सध्या त्यांना ज्या करपद्धतीनुसार सरकारला कर द्यावा लागतो त्यात मोठी वाढ करावी लागणार असल्याचेही संकेत सरकारने दिले आहेत.