येत्या २६ जानेवारीला राज्य सरकार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची घोषणा होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही त्या व्हायरल होत असून त्यावर चर्चा केली जात आहे. पण राज्यात नवे जिल्हे तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो. यामुळे राज्य सरकार असा निर्णय घेणाच्या अगोदर विचार करू शकते. गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडे नवे जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत त्यावर कोणत्याही सरकारने निर्णय दिलेला नाही. पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि माध्यमांतून राज्यात २६ जानेवारीला नवे जिल्हे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांनी दिलेल्या या नव्या जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्ह्याचा समावेश केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका हा नव्याने बारामती जिल्हा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या जिल्ह्यांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर बारामती जिल्हाचा आराखडा कसा असेल याचा फोटोच व्हायरल केला जात आहे. या फोटोत बारामती तालुक्याचा जिल्हा झाल्यास यामध्ये कोणत्या तालुक्यांचा समावेश केला आहे, हे दाखवण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र बारामती तालुका नव्हे आता जिल्हा याचीच चर्चा रंगू लागली आहे.
सोशल मीडियावर फोटोचीच चर्चा
या नकाशाच्या फोटोत बारामती, दौंड, शिरूर, भोर, पुरंदर, इंदापूर, फलटण, कोरेगाव या आठ तालुक्यांचा समावेश असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा फोटो नेटकऱ्यांनी व्हॅाटसॅपसह माध्यमावर व्हायरल केला आहे. यामुळे या फोटोची चर्चा केली जात आहे. वास्तविक, अद्यापर्यंत अधिकृतरित्या राज्य सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. जर निर्णय घ्यायचा झाल्यास यावर मोठे मंथन करावे लागेल, कारण नवा जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नवे शासकीय कार्यालये उभे करावी लागणार आहेत. यामुळे येत्या २६ जानेवारीला असा काय निर्णय राज्य सरकार घेते का हे पाहावे लागेल.