अद्याप कार्यादेश देणे बाकी ः वाटप पूर्ण होण्यास होऊ शकतो उशीर
पिंपरी – महापालिका प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच शालेय साहित्य मिळावे, यासाठी फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समिती सभेत काही शालेय साहित्याच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. तर, उर्वरित साहित्य खरेदीला आयुक्तांच्या अधिकारात मंजुरी दिलेली आहे. अद्याप साहित्य खरेदीसाठी कार्यादेश देणे बाकी आहे. त्यामुळे कार्यादेश देऊन साहित्य वाटप पूर्ण करण्यासाठी उशीर लागू शकतो. पर्यायाने, यंदाही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत मिळणार का, हा प्रश्न कायम आहे.
गणवेश, पी.टी. गणवेश, स्वेटर आणि विविध अभ्यासपुरक पुस्तके या शालेय साहित्य खरेदीच्या सदस्य प्रस्तावाला 28 फेब्रुवारीच्या स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली. त्याला प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागणार आहे. तर, आयुक्तांच्या अधिकारात उर्वरित शालेय साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्याला स्थायी समिती सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश, दोन पी.टी.गणवेश आणि एक स्वेटर देण्याचे नियोजन आहे. नव्याने निविदा न मागविता गतवर्षी असलेल्या तीन साहित्य पुरवठादारांनाच हे काम देण्यात आले आहे.
यापूर्वी दोन वर्षांसाठी हे काम देताना गणवेशासाठी चार कोटी, पी.टी. गणवेशासाठी तीन कोटी 80 लाख आणि स्वेटरसाठी एक कोटी 80 लाख रुपयांच्या निविदांची रक्कम निश्चित झाली होती. आता 2018-19 साठी आधीच्याच निविदा दराने प्रत्यक्ष खर्चास मंजुरी दिलेली आहे. पूर्वी दोन वर्षांसाठी हे काम दिलेले होते. आता एक वर्षासाठीच हे काम दिलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च कमी होणार आहे.
महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील सर्व विद्यार्थ्यांना सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमातंर्गत प्रयोगवही, भूगोल नकाशा वही, चित्रकला वही, व्यवसायमाला, स्वाध्यायमाला अंतर्गत विविध अभ्यासपूरक पुस्तके दिली जाणार आहेत. हे काम देखील जुन्याच पुरवठाधारकाला देण्यात आले आहे. त्यासाठी नव्याने निविदा मागविलेल्या नाही. वह्या, रेनकोट व दफ्तर खरेदीस मात्र आयुक्तांच्या अधिकारात मंजुरी दिली आहे. त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेणे बाकी आहे. महापालिकेच्या शाळा 17 जुनला सुरू होणार आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुरू होणे अपेक्षित आहे. वेगवेगळ्या शालेय साहित्यानुसार वाटपासाठी 45 ते 90 दिवस असा कालावधी निश्चित केलेला आहे.
“”महापालिका शाळांसाठी आवश्यक शालेय साहित्य खरेदी ही आर्थिक बाबीशी निगडीत बाब आहे. लोकसभा आचारसंहितेमुळे त्याबाबतच्या निर्णयाला विलंब झाला. आधीचे पुरवठादार सध्या आहे त्याच दरात काम करण्यास तयार होते. तसेच, त्यांच्या निविदेची मुदत तीन वर्षांची असल्याने त्यांनाच हे काम पुन्हा देण्यात आले. आचारसंहिता संपल्याने आता कामासाठी कार्यादेश देऊन साहित्य खरेदी होईल. 17 जुनला शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना साहित्य वाटप सुरू केले जाईल. दीड महिन्यांच्या कालावधीत हे वाटप पूर्ण होईल.”
– प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती