पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आज बैठक
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सोमवारी (दि.8) होत आहे. या बैठकीत राज्य शासन व राज्यपाल यांच्या वादात अडकलेल्या पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे परीक्षेसंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य काय भूमिका घेणार, हेच आता पाहावे लागणार आहे.
विद्यापीठाचे महत्त्वाचे समजले जाणारे अधिकार मंडळ म्हणजे व्यवस्थापन परिषद होय. करोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवस्थापन परिषदेची प्रत्यक्षात बैठक झालीच नाही. ऑनलाइन चर्चेला मर्यादा होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.
विद्या परिषद व परीक्षा मंडळांमध्ये परीक्षा संदर्भात यापूर्वीच चर्चा झाली आहे. त्यानुसार परीक्षेचा आराखडाही तयार करण्यात आला. हा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याबाबत सदस्यांमध्ये एकमत आहे का? हे ही यानिमित्ताने समोर येणार आहे.