विज्ञानविश्‍व: लोकसंख्या कमी होणार?

डॉ. मेघश्री दळवी
जगाची एकूण लोकसंख्या वाढत आहे, आणि 2050 मध्ये ती दहा अब्जापर्यंत जाईल असा अदमास आहे. युनायटेड नेशन्स ही संस्था लोकसंख्येचा नियमित मागोवा ठेवत आपले वार्षिक अहवाल प्रसिद्ध करत असते. या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अहवालात दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. लोकसंख्या वाढीचा जागतिक वेग मंदावतो आहे आणि आफ्रिकी देशातील लोकसंख्या तुलनेत वेगाने वाढते आहे.

मात्र आता इतर संशोधक लोकसंख्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. जगाच्या पाठीवर किती माणसं आहेत यासोबत त्यांच्या वयोगटाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आजमितीला साठीच्या पुढच्या व्यक्‍तींची संख्या जगात एक अब्जाहून अधिक आहे आणि ती वेगाने वाढत जाणार आहे. उलट जन्मदर त्याहूनही अधिक वेगाने घटतो आहे. त्यामुळे एक वेळ अशी येईल, की वयस्कर आणि दुर्बल व्यक्‍ती जास्त आणि त्यांना सांभाळायला तरुण माणसे मात्र अत्यंत कमी, असे चित्र दिसू लागेल.

वैद्यकीय सुविधा, विज्ञानाच्या मदतीने अनेक रोगांवर मात आणि एकूणच आरोग्यविषयक जागरूकता यामुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. शंभरहून अधिक वय असलेल्या व्यक्‍तींची संख्या एकट्या जपानमध्येच 70 हजारांच्या आसपास आहे, तर संपूर्ण जगात सुमारे 5 लाख आहे. येत्या 30 वर्षांत जगात 30 लाख लोक शंभरच्या पुढच्या वयाचे असतील.
जन्मदर घटण्यामागे अनेक कारणे आहेत. एकंदरीत प्रजननक्षमता कमी होत चालल्याचे वेगवेगळ्या वैद्यकीय संशोधनातून दिसत आहे. त्यामागे तऱ्हेतऱ्हेचे प्रदूषण, ताणतणाव, प्रक्रिया केलेल्या अन्नातील रसायनांचे प्रमाण अशी अनेक निरीक्षणे आहेत.

तर विभक्‍त कुटुंबपद्धतीत मुलांची देखभाल करणे कठीण पडते इथपासून ते एकूणच लग्नसंस्थेत होणारे विविध बदल इथपर्यंतची सामाजिक कारणेही भरपूर आहेत. जपान, हॉंगकॉंग अशा ठिकाणी जागांचे भडकते दर पाहून कित्येक तरुण मंडळी लग्न आणि मूल टाळत आहेत, तर काही युरोपीय देशांमध्ये तरुणांना उत्पन्नाची शाश्‍वती वाटत नसल्याने मूल नको आहे. त्यामुळे लोकसंख्या 2050 नंतर वेगाने घटू लागेल असे अंदाज शास्त्रज्ञ बांधत आहेत.

रोबोटिक्‍स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या वापरात झपाट्याने वाढ होत असल्याने माणसांची गरज कमी होत चालली आहे ही वस्तुस्थिती प्रगत देशांमध्ये दिसून येते. सोशल मीडिया किंवा इंटरनेटमुळे जगात कोणाशीही सहज संपर्क होऊ शकतो आणि जवळचा समाज जरुरी वाटत नाही. या सगळ्या बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेताना लोकसंख्येचा अंत:स्फोट किंवा घसरण अपरिहार्य आहे, असे समाजशास्त्रज्ञ मानतात.

एकदा का लोकसंख्या कमी होत गेली, की आपोआप प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यांना आळा बसेल अशी आशा काहींना वाटते. पण त्याच वेळी मानवजातीचे पुढे काय आणि क्‍लोनिंगसारख्या तंत्राचा आधार घ्यावा लागणार का, याकडे काही शास्त्रज्ञ गांभीर्याने पाहात आहेत. एकंदरीत लोकसंख्येच्या निमित्ताने माणसाचे भविष्य आणि त्या संदर्भात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, असेच म्हणावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.