इस्लामपुरातील जुनी गणेश भाजी मंडई स्थलांतरित होणार ?

प्रशासन ठाम..! तर कायदेशीर कारवाई

– विनोद मोहिते

इस्लामपूर – शहरातील जुनी भाजी मंडई स्थलांतरित करण्यावरून मंडई परिसरामध्ये शुक्रवारी तणावाचे वातावरण झाले. “आम्ही इथंच बसणार अशी विक्रेत्यांची भूमिका तर इथं बसायचे नाही असा पवित्रा नगरपालिका प्रशासनाचा घेतला.

माजी नगरसेवक कपिल ओसवाल, संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी यांनी या निर्णयाला स्थिगीती मिळावी म्हणून विक्रेत्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती केली. पण वाहतुकीला अडथळा ठरणारी जुनी मंडई नव्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंडईत आजपासून सुरू झाल्याचे निवेदन माध्यमाना दिले आहे. जुन्या जागेत बसणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून नगरपालिका प्रशासनाने चौकाचौकात जुनी भाजी मंडई नव्या प्रशस्त जागेत पाच फेब्रुवारी पासून स्थलांतरित होणार असल्याचे फलक लावले होते.यामुळे आज सकाळ पासून जुन्या मंडईत पोलीस बंदोबस्त होता. कोणत्याही विक्रेत्यांना बसू दिले नाही.

तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही जणांचा भाजी पाला जप्त केला. यानंतर विक्रेत्यांना स्थलांतरित जागेत जाण्याची विनंती करण्यात आली. पण त्यांनी ती धुडकवली. तिथे माजी नगरसेवक कपिल ओसवाल, संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी यांनी विक्रेत्यांचे नेतृत्व करत प्रशासनाने हा निर्णय बदलावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यानंतर सर्व भाजीविक्रेत्यांनी नगरपालिकेच्या आवारामध्ये धाव घेतली.महिला,पुरूष विक्रेते तासभर ठाण मांडून होते. प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांनी ओसवाल व तांबोळी यांचेसह मुख्याधिकारी केबिनमध्ये धाव घेतली. “आम्हाला याच जुन्या मंडईत बसायचे आहे. अपुऱ्या सुविधा आम्ही निर्माण करू. वाहतुकीला अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेतो अशी भूमिका मांडली.

यावेळी मुख्याधिकारी माळी यांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अण्णासाहेब डांगे चौकात नव्या सर्व सोयी नियुक्त अशा छत्रपती शिवाजी महाराज मंडईत बसावेच लागेल असा पवित्रा घेतला. तुमचे निवेदन २२ तारखेच्या नगरसेवकांच्या सभेत सादर करतो. पदाधिकारी त्याबाबत निर्णय देतील. पण तो पर्यत जुन्या मंडईत बसण्यास मज्जाव असेल असे सूचित केले. त्यानंतर भाजीविक्रेत्यांनी नगरपालिका आवारातून जाणे पसंत केले.

शहराच्या पश्चिमेला गणेश मंदिराच्या परिसरात जुनी भाजी मंडई आहे. या मंडईला शंभर वर्षाचा इतिहास आहे. यापूर्वी २००६ साली ही मंडई स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला होता. पण तेव्हा तिथे सुविधा नव्हत्या. सुविधा द्या मग जातो असे त्यावेळी भूमिका होती. आतां सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

मंडई नव्या जागेतच भरेल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. याप्रश्नावर दोन दिवसांच्या पूर्वी हेच विक्रेते नगरपालिकेच्या आवारात आले होते. तासभर ठाण मांडून होते. आज शुक्रवारी पुन्हा त्यांची निराशा झाली. उद्या काय बघू म्हणत विक्रेते निघून गेले. सध्या सत्तारूढ अथवा विरोधी कोणत्याही नगरसेवकांनी प्रश्नांची दाखल घेतलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.