अतिरिक्त भांडवल सुलभता वळत आहे शेअरबाजाराकडे
मुंबई – विकासदर कोसळणार असूनही शेअर निर्देशांक वाढत असल्याबद्दल एकीकडे तीव्र चिंता व्यक्त केली जात असतानाच काही बाजार विश्लेषकांनी मात्र मार्च 2021 पर्यंत शेअरबाजार निर्देशांक सहा टक्क्यांनी आणखी वाढतील, असा दावा केला आहे.
बीएनपी परिबा या ब्रोकरेज संस्थेने केलेल्या दाव्यानुसार मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक मार्चपर्यंत 41,500 अंकांपर्यंत जाऊ शकतो. रिझर्व्ह बॅंक आणि इतर देशातील सर्व बॅंकांनी केलेल्या भांडवल सुलभतेमुळे बराच पैसा शेअरबाजाराकडे वळत आहे. तो प्रवाह मार्चपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर निर्देशांक वाढतील असे या संस्थेचे म्हणणे आहे.
निर्देशांक आणि अर्थव्यवस्थेत तफावत निर्माण झाल्याबद्दल बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. निश्चितपणे विकासदर कमी होणार आहे. म्हणजेच कंपन्यांचे उत्पादन कमी होणार आहे. त्याचबरोबर करोना आणखी पूर्ण आटोक्यात आला नसताना गुंतवणूकदार शेअरबाजारात गुंतवणुकीचा डाव खेळत आहेत असे बऱ्याच जणांना वाटते. निर्देशांकावरील सुज लवकरच उतण्याची शक्यता काही जण व्यक्त करतात.
या संस्थेने असे म्हटले आहे की चीन किंवा अमेरिकेप्रमाणे भारतात नवे उद्योग वेगात निर्माण होऊन विकसित होत नाहीत. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांना जुन्या स्थिर उद्योगांचा गुंतवणुकीसाठी आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एअरटेल, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर त्यांच्या मूल्यांकनापेक्षा 16 टक्क्यांनी जास्त असले तरी याच शेअरची मार्च महिन्यापर्यंत खरेदी जास्त प्रमाणात राहील. ज्या बॅंका मोबाइल आणि डिजिटल तंत्रज्ञानात गुंतवणूक करणार नाहीत ते आपले ग्राहक गमवतील. त्याचबरोबर मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या वर्क फॉर्म होमद्वारे नफा वाढवतील. ज्या कंपन्या हे करू शकणार नाहीत त्या कंपन्या मागे पडतील.
गुरुवारी शेअर निर्देशांकांत घट
गुरुवारी सकाळी शेअरबाजारात खरेदीचे वातावरण होते. मात्र, सेवा क्षेत्राची उत्पादकता अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात वाढल्यानंतर विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 95 अंकांनी म्हणजे पाव टक्क्यांनी कमी होऊन 38,990 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 7 अंकांनी कमी होऊन 11,527 अंकांवर बंद झाला. दरम्यान, व्होडाफोन, आयडिया कंपनीचा शेअर गुरुवारी 30 टक्क्यांनी वाढला.