अवकाळीनंतर शेतकरी उभारी घेणार का?

शासनाकडून पंचनामे होऊनही आर्थिक कुंचबणा

सविंदणे – राजान छळलं, नवऱ्यानं मारलं, पावसानं झोडपलं तर दाद कुणाकडे मागायची, अशी अवस्था गेल्या महिन्यात अवकाळी, वादळी पावसाने शेतकऱ्यांची केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांना सलाईन लावण्यापुरती मदत जाहीर केली आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना ही मदत “मरणदान’च ठरली आहे. शिरूर तालुक्‍यातील 6 हजार 298 हेक्‍टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यातून आता शेतकरी उभारी घेणार काय, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.

एकाच महिन्यात वर्षभराचे गणित कोलमडून टाकल्याची कैफियत शिरूर तालुक्‍यातील शेतकरी मांडत आहे. अवकाळी पावसाने वाया गेलेल्या पिकांचा पंचनामा होऊनही शासनाकडून अजूनही मदतीचा हात नाही. विमा कंपन्याही मूग गिळून गप्प आहेत. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने ऐन उन्हाळ्यातही कसाबसा जगवलेला ऊस, खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मका, मेथी, धना, कडधान्यांची वाट लागली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे दिवाळीला गोडधोड करता आले नाही. मुलांना कपडे घेता आली नाहीत.

या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने शेती कसायला लागला आहे. वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी आता महिन्यापूर्वीची निसर्गाने लगावलेली चपराक विसरून शेती कसत आहे. सध्या शेतकरी कांदा, बटाट्याची लागवड, रब्बी हंगामातील इतर पिके घेताना दिसत आहे. निसर्गाने पिकांवर वरवंटा फिरविला तरी पुन्हा जगण्याची उर्मी त्यांच्या मनात अजून व्यापून राहिली आहे.

शिरूर तालुक्‍यातील 6 हजार 298 हेक्‍टर क्षेत्रावर नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. शासनाकडून खरीप पिकांसाठी प्रति हेक्‍टर आठ हजार व फळबागेसाठी अठरा हजार रुपये मदत देण्याचे नियोजन आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच तहसीलदारांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत निधी वाटप केला जाईल.
– आर. डी. बनकर, तालुका कृषी अधिकारी, शिरूर.

शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक ही मदत तुटपुंजी स्वरूपाची आहे. पिकांना झालेला खर्चही त्यात भागत नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरीव स्वरूपाची मदत करुन पिक कर्ज पूर्णपणे माफ करावे.
-राजेंद्र गावडे, संचालक, घोडगंगा सहकारी कारखाना.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)