केंदूर परिसरातील दुष्काळाचा टिळा पुसणार काय?

केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीवर अपेक्षांचे ओझे

केंदूर – शिरूर तालुक्‍यातील केंदूर- पाबळ जिल्हा परिषद गटातील प्रमुख समस्या सिंचनाची आहे. केंदूर आणि पाबळ या सर्वात मोठ्या गावांना बाराही महिने दुष्काळाच्या समस्येला सामोरे जावे लागते. शिरूर तालुक्‍यातील 39 गावांमधील 12 गावांच्या पाणीप्रश्‍नाबाबत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व ग्रामस्थांनी मिळून मतदानावर बहिष्कार घालण्याचे शस्र उगारले होते. मात्र, आंबेगावच्या दोन्ही नेत्यांनी ग्रामस्थांना शांत करण्यात यश मिळविले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाबळ गटातून राष्ट्रवादीला 71 टक्‍के तर शिवसेनेला 26 टक्‍के मतदान मिळाले आहे. त्यामुळे पाणीप्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीला हे आव्हान पेलावे लागणार आहे.

शिरूर तालुक्‍यातील पाबळ- शिक्रापूर रस्ता, पाबळ-केंदूर रस्ता, केंदूर-वढु बुद्रुक रस्ता अजूनही खड्डयांच्या मालिकेतच गुंतलेला आहे. यावेळी आता पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. आगामी पाच वर्षांत या बारा गावांचा पाणी प्रश्‍न मिटण्यासाठी आता निवडून गेलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे. हे लोकप्रतिनिधी आता या गटात येणार असल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यांच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंदूर- पाबळ गटातून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला तब्बल 71 टक्‍के मतदान मिळाले आहे. शिवसेनेला लोकसभेच्या तुलनेत तब्बल 10 टक्‍क्‍यांनी घसरण होऊन अवघे 26 टक्‍के मतदान मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते लोकसभेच्या तुलनेत 11 टक्‍के मते वाढवण्यात यशस्वी झाले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी शिरूरच्या 39 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंदूर-पाबळ, रांजणगाव, टाकळी हाजी या तीन जिल्हा परिषद गटांचा समावेश करण्यात आला. मात्र, केंदूर- पाबळ गटातील चार गावे शिरूर-हवेली मतदारसंघात समाविष्ट आहेत.

आंबेगावला जोडलेल्या या गटातून एकूण झालेल्या मतदानापैकी 62 टक्‍के मतदान झाले आहे. यामध्ये खैरेवाडी, धामारी, पाबळ, केंदूर, करंदी, हिवरे, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, मुखईच्या गावकऱ्यांनी राष्ट्रवादीला दमदार साथ दिली आहे. खैरेनगरमध्ये राष्ट्रवादीला कौल मिळाला आहे.

पाणीप्रश्‍नांवर जनरेटा उभारण्याची गरज
शिरूर तालुक्‍यातील केंदूर गटात पाणीप्रश्‍न बिकट आहे. त्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी पाणीप्रश्‍नावर जनरेटा उभारण्यात आला होता. ग्रामसभेचे ठराव, निवडणुकीवर बहिष्कार आदी अस्त्र उगारल्यामुळे या परिसरातील राजकीय वातावरण तापले होते. त्यावेळी त्याचे पडसाद हे प्रस्थापिताविरोधात गेले होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ मिळाल्यामुळे नागरिक नवनिर्वाचित आमदारांकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे जनरेट्यातून पाणीप्रश्‍न निकाली निघणार का, पाठपुराव्यातून हा प्रश्‍न मार्गी लागणार, याकडे सर्वांच्या नुपजरा लागल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.