सवादे येथील जाहीर सभेत इंद्रजित मोहिते यांचा सवाल
कराड – मलकापूरच्या माळावर माझा भ्रष्टाचार उभा असल्याची कबुली देणाऱ्या आमच्या चुलत्यांच्या घरातल्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारणार का? असा सवाल करत आपल्या सर्वांच्या आपुलकीच्या नात्यांमधील व स्वच्छ चारित्र्य असलेल्या पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील यांनी कधी नाकाला रुमाल लावलेला नाही, अशा नेत्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले.
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सवादे (ता. कराड) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण, अविनाश मोहिते यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, समाजाच्या पाठबळावर निर्माण झालेले पृथ्वीराजबाबा व श्रीनिवास पाटील हे युगपुरुष तुमच्या मदतीला कायम आहेत. कॉंग्रेसने आपल्या पक्षातील सर्वांना प्रेमाची वागणूक दिली. पण याचा फायदा घेऊन डाव्या पंगतीला जेवण्यास बसले, तेच नेते भाजपमध्ये गेले आहेत. यशवंतराव मोहिते यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर उभे राहून जातीयवादी पक्षाविरूद्ध थेट हल्ला चढवला होता. याच यशवंतराव मोहितेंच्या घरात मी सोडून सर्वांनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे.
अविनाश मोहिते म्हणाले, पृथ्वीराजबाबा व अतुल भोसले यांची तुलना होऊ शकत नाही? त्यांना सर्वसामान्यांना भेटण्यासाठी चार ते पाच तास लागतात असा आरोप त्यांनी केला. जयवंतराव जगताप, पै. नानासाहेब पाटील, शंकरराव खबाले, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.