पुणे – भाजपने पुणे महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्याचबरोबर सत्ता आमचीच राहणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला प्रत्युतर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेची सत्ता खेचून घेणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अजितदादांनीही एकप्रकारे शड्डूच ठोकल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस यांनी गुरुवारी पालिकेत आढावा बैठक घेतली. आगामी पालिका निवडणूक लक्षात घेता फडणवीस यांनी पालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे.
यावेळी “फडणवीस यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवू आणि जिंकू’ असे सांगितले. यावर विचारले असता उपमुख्यमंत्री पवार यांनी “ते म्हणतात सत्ता घेणार, तर मी म्हणतो सत्ता खेचून घेणार’ अशा शब्दांत उत्तर दिले. तसेच पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता पवार म्हणाले, “पक्षात प्रवेश करताना वाजतगाजत त्यांचे स्वागत करू,’ असे सांगत कोण प्रवेश करणार याचे उत्तर गुलदस्तातच ठेवले. मात्र, निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात पहिल्यांदा घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
23 गावे समावेशाचा निर्णय लवकरच
महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत काही कायदेशीर प्रक्रिया असते. त्यानुसार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्यावर सुनावणी होईल. या प्रक्रियेसाठी जितका वेळ आवश्यक असतो, तितका तो द्यावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण होताच 23 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.