अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड

उंब्रज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. तसेच सोशल मीडिया व अफवांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन उंब्रज पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या पार्श्‍वभूमीवर तारळे, ता. पाटण येथे आयोजीत बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपसरपंच रामचंद्र देशमुख, शिवदौलत बॅंकेचे संचालक अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव, भाजपचे तालुका सरचिटणीस अनिल माने, गौरव परदेशी, राजू जाधव, आण्णा सोनावले, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोरड म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने आचारसंहिता व जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे राजकीय मुद्दे व अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

ज्या गावात रात्री अथवा धार्मिक कार्यक्रम असतील, त्यांना प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊनच ते साजरे करावेत. इतर खर्चाला फाटा देत गावात विधायक कामे करुन सामाजिक कार्य करावे. लोकसभा निवडणुकीत कोण कुठल्या पक्षात गेला, तो त्याचा वैयक्तीक निर्णय आहे. पण तुम्ही आपला तोल ढळू देऊ नका. सोशल मीडियाचा वापर करताना अफवा अथवा वाद उत्पन्न होईल, असे मेसेज पुढे पाठवू नका. पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करा. गावातील प्रतिष्ठित लोकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी तरुणांना मार्गदर्शन करावे. मतदान भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. यावेळी तारळे विभागातील ग्रामस्थ व पोलीस पाटील उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.