नवी दिल्ली – पोलंडच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या भेटीवर जाणार आहेत. आपल्या या भेटीदरम्यान भारत आणि युक्रेन दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचे पंतप्रधानांनी दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या आमंत्रणाला मान देऊन मोदी युक्रेनला भेट देत आहेत. भारतीय पंतप्रधानांची आतापर्यंतची ही पहिलीच युक्रेन भेट आहे. भारत आणि युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासंदर्भात झेलेन्स्की यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.
तसेच सध्या सुरु असलेल्या युक्रेन विवादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दृष्टीने आपले विचार मांडण्याबाबत आपण उत्सुक आहोत. एक मित्र तसेच एक भागीदार म्हणून आम्हाला या भागात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्याची आशा असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
हा दौरा दोन्ही देशांतील व्यापक संपर्काची नैसर्गिक सातत्यता राखण्याचा मार्ग म्हणून काम करेल आणि येत्या काळात अधिक मजबूत आणि अधिक चैतन्यपूर्ण संबंधांचा पाया निर्माण करण्यात मदत करेल असा विश्वास आपल्याला वाटतो, असेही मोदींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सहा आठवड्यांपुर्वीच मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली होती. आता झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या चर्चेबाबत उत्सुकता आहे.