विश्रांतवाडी – वडगावशेरी मतदारसंघात विकासाचे एक नवे पर्व सुरू करणे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. “माझं गाव, माझं कर्तव्य’ या भावनेतून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीचा भागीदार बनवणार आहे. मांजरी गावासह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हाच माझा संकल्प आहे, असे आश्वासन वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष- महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.
पठारे यांनी प्रबळ विकासाचा नारा घेऊन वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील मांजरी खुर्द गावठाण, पवार वस्ती, माणिक वस्ती, दत्त मंदिर रस्ता, सृष्टी पार्क, मानकाई नगर, माहेर संस्था रस्ता, साई पार्क परिसरातून पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पठारे बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच ठिकठिकाणी पठारे यांचे औक्षण करत हार-फुलांनी स्वागत केले. या पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान पठारे यांनी नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी गावात स्वच्छता, पाण्याचा योग्य पुरवठा, शिक्षण, आरोग्यसुविधा, चांगले रस्ते, महिलांसाठी सुरक्षा, तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मांजरी व वडगावशेरी मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याबरोबरच नागरिकांना एक उत्कृष्ट जीवनमान उपलब्ध करून देणे, हाच माझा मुख्य उद्देश असल्याचे पठारे म्हणाले.