वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आपण निवडून आलो तर जागतिक तापमान वाढीच्या उपाययोजनांमध्ये अमेरिका मोठ्या उत्साहाने सहभागी होईल. या कार्यासाठी आम्ही किमान 2 ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम खर्च करू, अशी ग्वाही अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी दिली आहे.
ट्रम्प प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी पॅरिस करारातून अमेरिकेला बाहेर नेले होते पण आपण निवडून आल्यास आपण पुन्हा पॅरीस करारात अमेरिकेला सहभागी करू असेही बिडेन यांनी म्हटले आहे.
कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे व त्यातून पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. या कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पॅरिस करारामुळे अमेरिकेवर कार्बन उत्सर्जनावर मोठे निर्बंध येणार होते व त्यामुळे त्यांना विकासकामांना तसेच उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करावे लागणार होते.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हे निर्बंध परवडणारे नाही, असे कारण देऊन अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट पॅरिस करारातूनच अमेरिकेच अंग काढून घेतले होते. त्यांच्या या निर्णयाचा जागतिक पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नाला मोठा फटका बसला होता.
तथापि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी मात्र आपल्या राजवटीत अमेरिका पुन्हा पर्यावरण रक्षणाच्या कार्यात आपले योगदान देईल, अशी ग्वाही दिली आहे.