आंतरजातीय विवाह अनुदानाचा प्रश्‍न सोडविणार

डॉ. सुरेश खाडे यांचे आश्‍वासन; सामाजिक न्याय भवनाचे ऑडिट होणारच

सातारा – सातारा जिल्ह्यासह राज्यातील आंतरजातीय विवाह अनुदान प्रलंबित आहे. अनुदानापैकी केंद्र शासनाच्या हिश्‍श्‍याची 50 टक्के रक्कम येणे बाकी आहे. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट घेऊन लवकरात लवकर दाम्पत्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

विधानसभेत मित्र सोबत हवा
सुरेश खाडे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पत्रकार परिषदेला डॉ. येळगावकर आवर्जून उपस्थित होते. मित्राला येत्या विधानसभा निवडणुकीत न्याय देणार का, असे खाडे यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर विधानसभेत मित्र सोबत असला पाहिजे, त्यासाठी माझ्या कायमच शुभेच्छा आहेत आणि पुढील काळातही राहणार आहेत, असे खाडे यांनी सांगितले.

त्याचबरोबर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या बांधकामाबाबत समोर आलेल्या तक्रारीबाबत लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ऑडिट करून दर्जाहीन कामाची दुरूस्ती करण्यात येईल, असेही खाडे यांनी सांगितले. मिंत्रपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. खाडे रविवारी प्रथमच सातारा दौऱ्यावर आले होते.

त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे, सिध्दी पवार, मिलींद काकडे, विकास गोसावी आदी प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या 132 दांम्पत्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याबाबतचा मुद्दा पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर खाडे म्हणाले, “”अनुदानाचा प्रश्‍न संपूर्ण राज्यात आहे. राज्याने आपल्या 50 टक्के हिश्‍श्‍याच्या रकमेची तरतूद केली आहे. केंद्र सरकारकडून उर्वरित 50 टक्के निधी येणे बाकी आहे. त्यासाठी रामदास आठवले यांना भेटून केंद्राकडील प्रलंबित रकमेची मागणी करणार आहे. येत्या महिन्याभरात दांम्पत्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल.”

त्याचबरोबर साताऱ्यातील सामाजिक न्याय भवन इमारतीची माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी केल्यानंतर बांधकामाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पुढे काहीच झाले नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी निदर्शनास आणून दिला. त्यावर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तपासणी करून दर्जाहीन कामाची दुरूस्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थी वसतिगृहांची स्थिती ठिक नाही आणि विद्यार्थ्यांना पुरेसे व दर्जेदार जेवण मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत, यावर स्पष्टीकरण देताना खाडे म्हणाले, “”राज्याच्या अनुसूचित जाती- जमाती समितीवर कार्यरत असताना राज्यभर दौरे केले. त्यावेळी वरील मुद्दे कायम समोर आले. त्यामुळे आता जी वसतिगृहे खासगी जागांवर सुरू आहेत. ती लवकरच शासनाच्या वसतिगृहांमध्ये स्थलांतरित करण्यात येतील. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून वसतिगृहांच्या बांधकामांना सुरूवात करण्यात येईल.” विद्यार्थ्यांना पुरेसे व दर्जेदार जेवण देण्यासाठीदेखील आपण प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात 500 कोटींनी वाढ

राज्याचा नकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 12 हजार 303 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 500 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेत 600 रुपयांवरून 1000 रुपये अनुदान वाढविण्यात आले आहे. 80 टक्के दिव्यांगांना घरकुलासाठी 100 कोटी रुपये व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून कॅरम हाऊस व इतर संकल्प राबविणार आहे, असे यावेळी खाडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.